Sunday, 25 November 2018

उर्मी जिंकण्याची( Passion to win)

                       उर्मि जिंकण्याची
                कॅरोली टकास हा हंगेरीयन सैनिक १९३८ मध्ये जगातला प्रथम श्रेणीचा पिस्तूल शूटर म्हणून ओळखला जात होता.१९४० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्ण पदकाचा तोच एकमेव दावेदार होता नव्हे तर तोच सुवर्ण पदक जिकणार हे सर्वांनाच माहीत होते पण या स्पर्धेच्या एक महिना अगोदर एक दुर्घटना घडली की ज्या घटनेने कॅरोलीच्या जीवनाला हादरवून सोडले. सैन्यातील युद्ध सरावावेळी कॅरोलीच्या उजव्या हातातच ग्रेनेडचा स्फोट होऊन त्याचा उजवा हात कायमस्वरूपी निकामी झाला.कॅरोलीचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न संपले होते.
             आपले ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगल्यामुळे व नेमका उजवा हातच गमावल्यामुळे कॅरोलिन प्रचंड निराश झाला होता. त्याच्या सहकाऱ्यांसह बऱ्याच लोकांना कॅरोली पुन्हा कधीच मैदानात उतरणार नाही असे वाटत होते पण कॅरोली वेगळाच विचार करत होता. त्याने जे काही गमावले होते त्यापेक्षा जे काही त्याच्याकडे होते त्यावरती लक्ष दिले. त्याने डाव्या हाताने शूटिंगच्या सराव सुरू केला. तो कित्येक महिने कठोर सराव करत राहिला.महत्वाचे म्हणजे त्याने सरावादरम्यान कधीच उजवा हात निकामी होण्यावर दुःख व्यक्त करण्यात वेळ घालविला नाही.त्याने आपले संपूर्ण चित्त फक्त डाव्या हातावर केंद्रित केले होते. मनाची प्रचंड एकाग्रता, ज्वलंत इच्छाशक्ती व पुन्हा एकदा उभं राहण्याच्या निर्धारामुळे त्याने डाव्या हातालाही उजव्या हाताप्रमाणेच शूटिंगमध्ये पारंगत केले.
                 १९३९ मधील हिवाळ्यात होणाऱ्या हंगेरीयन नॅशनल पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये कॅरोलीने फक्त सहभागच घेतला नाही तर सर्वांना आश्चर्यचकित करत ती स्पर्धाही जिंकली. कॅरोलीचे मनोबल प्रचंड वाढले होते.तो प्रचंड आत्मविश्वासाने पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी तयार झाला पण दुसऱ्या महायुद्धामुळे १९४० व १९४४ च्या ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत पण कॅरोली प्रचंड आशावादी होता तो न थांबता सराव करत राहिला. १९४८ मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक मध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले. त्यावेळी तो ३८ वर्षाचा होता. कॅरोलीने त्या दिवसासाठी १० वर्षे तपश्चर्या केली होती. पुढे १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक मध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले आणि सलग दोन वेळा सुवर्णपदक मिळविण्याचा विश्वविक्रम केला.
      कॅरोलीच्या जीवनात घडलेल्या अपघाताने त्याच्यातील विश्वविजेता संपवण्याचा प्रयत्न केला परंतु तो पुन्हा कणखरपणे उभा राहिला आणि फक्त विश्वविजेताच नव्हे तर एक जिंकण्याचा मूर्तिमंत प्रेरणास्रोत म्हणून जगासमोर आला. हे शक्य झाले केवळ त्याच्यातील अनपेक्षित घटनांकडे सकारात्मक वृत्तीने पाहण्याच्या दृष्टीकोणामुळे, जे आपल्याकडे नाहीये त्यापेक्षा जे  आपल्या जवळ आहे त्याकडे स्रोत म्हणून पाहण्याच्या जाणिवेने,आव्हानाला ही आव्हान देईल अशा दुर्दम्य  इच्छाशक्तीने,गगनचुंबी हिमालयासारख्या अचल निश्चयाने,वादळातही तेवत राहणाऱ्या ज्योतिप्रमाणे सतत आशावादी राहण्याने आणि सूर्याची प्रखरता डोळ्यात उतरवुन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात जिंकण्याची उर्मी सतत जिवंत ठेवल्यामुळे.
        आपल्या जीवनात संकटे येतात ती आपल्यातील यशशिखरावर घेऊन जाणाऱ्या  क्षमतांची जाणीव होण्यासाठीच. गरज आहे ती कॅरोलीन सारखी जिंकण्याची उर्मी बाळगण्याची.

*Let's prepare yourself to win the world.

Mr.Abhijeet Manav.
 (Mind trainer & NLP practitioner)

Wednesday, 21 November 2018

धारणा ( Empower your beliefs)

          धारणा( Empower your beliefs)                               
                 भल्यामोठ्या हत्तीला छोटयाशा साखळीने बांधून ठेवलं जातं व त्यास साखळी तोडणं शक्य असतानाही, तो हतबल होऊन त्या नाजूक साखळीशी आयुष्यभर बांधला जातो ही गोष्ट आपणा सर्वांनाच माहीत आहे. हे सर्वज्ञात आहे की, त्या प्रकारची साखळी हत्तीला आता बांधली गेली तर तो सहज तोडून देईल पण जी साखळी तो तोडू शकत नाही ती त्यास लहान असतानाच बांधली गेली होती तत्कालीन स्थितीत त्याने साखळी तोडण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला असतो पण तो साखळी तोडण्यास शारीरिक दृष्ट्या अक्षम असल्यामुळे साखळी तोडू शकत नव्हता.अनेकदा प्रयत्न करूनही साखळी तोडण्यात अपयश आल्यामुळे, आपण ही साखळी कधीच तोडू शकत नाही असा त्याचा पक्का विचार बनला होता व त्या बरहुकूम त्याचे वर्तन घडत होते की जे कमजोर,अनपेक्षित, व तर्कविसंगत असे होते. मनाशी घट्ट केलेल्या मतामुळेच हत्ती कमकुवत व अनपेक्षित वर्तन करत होता. या गोष्टीतल्या हत्तीने साखळी बद्दल बनविलेल्या मतास धारणा असे म्हणतात.अशा कमकुवत धारणेमुळेच हत्ती कमकुवत बनला होता. शारीरिक सक्षमता असूनही केवळ मर्यादित धारणेमुळे तो हतबल झाला होता.
       व्यक्तीचा विचार, त्याचा स्वतः सह जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्याच्या कडून केले जाणारे प्रत्येक वर्तन या सर्वांचे मूळ हे व्यक्तीच्या धारणांमध्ये असते. धारणा या जणू काही जगण्याचे अलिखित नियमच असतात की ज्यांना अनुसरूनच व्यक्तीचा वर्तनव्यवहार होत असतो. धारणा म्हणजे व्यक्तीला स्वतःशी व बाह्यजगाशी व्यवहार करण्यास प्रेरणा देणारे व दिशादर्शन करणारे जणू होकायंत्रच असतात.व्यक्तीला येणाऱ्या प्रत्येक घटनेतील अनुभव व त्याची तीव्रता ही त्या घटनेकडे पाहण्याच्या व त्या बद्दल  विचार करण्या मागील धारणेवरच अवलंबून असते.व्यक्तीच्या जीवनातील यशापयश, नात्यांमधील सुख-दुःख,सकारात्मकता- नकारात्मकता,सक्षमता-अक्षमता,उत्साह-निरुत्साह आणि बरच काही व्यक्तीने कोणत्या धारणांना जवळ बाळगले आहे त्यावरून ठरते यात शंका नाही आणि म्हणूनच व्यक्ती वर्तनातील व वर्तन निर्मित परिस्थितीतील आमूलाग्र बदल हा व्यक्तींमधील धारणांतील संपूर्ण बदलाशिवाय शक्य नाही.
         साधारणपणे व्यक्तीच्या धारणा या तिच्या लहानपणातच तयार झालेल्या असतात.व्यक्तीला मिळणारे कौटुंबिक-सामाजिक- शालेय वातावरण यांचा धारणा बनण्यात महत्वपूर्ण वाटा आहे. व्यक्तीला अजाणतेपणी मिळणाऱ्या शिकवणीतून व व्यक्तीने सभोवतालच्या वातावरणाचे निरीक्षण करून, अनुकरण करून स्वतःमध्ये  धारणांची पेरणी केलेली असते.एकदा धारणा तयार झाल्या की बऱ्याचदा व्यक्ती त्यामध्ये बदल करण्याचा विचार करत नाही सबब होतं असे की व्यक्तीला सदर धारणाधारीत वर्तनाचे तेच तेच परिणाम येतात आणि व्यक्ती त्यास आपलं भाग्य समजते पर्यायाने स्वभाव बदलता येत नाही किंवा स्वभावाला औषध नसतं अशा प्रकारच्या मानवी विकासाला,बदलाला व अमर्यादित शक्तीला लगाम लावणाऱ्या अक्षम धारणांची निर्मिती करते. आपल्याकडे तर असं म्हटलं जातं की व्यक्तीच नशिब अगोदरच लिहून ठेवलेलं असतं त्यामुळे जीवनात जे काही वाट्याला येईल ते भोगाव लागतं, व्यक्तीच्या नियंत्रणात काहीच असत नाही,अशा धारणा व्यक्तीला निराशावादी,परावलंबी व निष्क्रिय बनवतात पण आनंदाची गोष्ट अशी आहे की व्यक्तीला आपल्या धारणांमध्ये हवा तसा बदल करता येतो पर्यायानें आपले विचार, दृष्टिकोन, भावनांचे प्रकटीकरण व वर्तनात 360 अंशात परिवर्तन करून आपले जीवन सुखी, आनंदी व समाधानी बनवता येते. त्याकरिता गरज आहे, आपणास अपयशी करणाऱ्या वर्तन व विचारांची ओळख होण्याची व त्यामागील आपल्यातील अलौकिक सामर्थ्याला मर्यादित करणाऱ्या धारणांची जाणीव होण्याची. चला तर मग स्वतःला अमर्यादित सामर्थ्यशाली बनवूया......


*Let's empower yourself by imbibing empowering beliefs in yourself.


Mr.Abhijeet Manav.
(Mind trainer and NLP practitioner)

Sunday, 18 November 2018

प्रत्याभरणाचे तत्व.( Principle of the feedback)

            प्रत्याभरणाचे तत्व ( Principle of the feedback)

     यशस्वी जीवन हा आजकाल एक परवलीचा शब्द झालेला आहे. कुटुंब, समाज,प्रसार माध्यमे,विविध जाहिराती या सगळ्यांकडून व्यक्तीने यशस्वी होणं किती गरजेचं आहे याचे डोस व्यक्तीला नेहमीच पाजले जातात आणि म्हणूनच हरेक व्यक्ती यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करतोय.पण नेमकं यशस्वी होणं म्हणजे काय? हे सांगणे फार कठीण आहे. यश हे व्यक्तिसापेक्ष असते. ज्याची त्याची यशाची वेगळी व्याख्या असते. यश काहीही असू शकते जस की एखाद्या विद्यार्थ्यांसाठी ९०% गुण प्राप्ती म्हणजे यश असू शकते तर एखाद्यासाठी अगदी ४०% गुण प्राप्त करणे सुद्धा यश असू शकते.यशाबद्दलच्या दृष्टिकोणात विविधता जरी असली तरी यश प्राप्तीच्या मार्गावर होणाऱ्या अपेक्षा भंगाकडे म्हणजेच अपयश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन विकसित होणं आवश्यक आहे. कारण अपयशाकडे व्यक्ती कशी पाहते यावरच त्याचा यशाचा पर्यायाने जीवनाचा प्रवास सुखकारी असणार की वेदनादायी असणार हे अवलंबून आहे.अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणून अपयशाला सकारत्मकतेने पाहण्यासाठी व्यक्तीला उद्युक्त केले जाते पण व्यक्तीला वारंवार अपयशाला सामोरे जावे लागले तर या म्हणीवर त्याचा विश्वास दीर्घकाळ टिकत नाही मुळातच अपयश हा पूर्णपणे नकारात्मकता दर्शवणारा शद्ब आहे यात शंका नाही.आजकाल ज्या प्रकारे यशस्वी होण्यासाठी समाजाकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या व्यक्तीला जो तगादा लावला जातो त्यामुळे,शिवाय आपण यश संपादन करू शकलो नाही तर समाजाकडून  आपण अपयशी ठरवले जावू या भावनेतून व्यक्तीला येणारे ताणतणाव, निराशा, उदासीनता,खिन्नता यामध्ये प्रचंड वाढ होताना दिसते आहे.
               यशाकडे व्यक्तिसापेक्ष दृष्टिकोनातून पाहण्यासाठी व यशप्राप्ती करताना होणाऱ्या अपेक्षा भंगातून निर्माण होणाऱ्या बिकट मानसिक अवस्थेतून सही सलामत बाहेर पडून यशाकडे पुन्हा सकारात्मकतेने वाटचाल करणेसाठी आपण प्रत्याभारणाच्या तत्वाचा अंगीकार केला पाहिजे. हे तत्व माणसाला यशप्राप्ती मार्गावरील आव्हानांकडे व अपयशी समजले जाणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा प्रगल्भ, सकारात्मक व निरंतर शिकत राहण्याचा उदात्त दृष्टिकोन प्रदान करते. हे तत्व सांगते की ,जीवनात अपयश असतंच नाही,तर फक्त प्रत्याभरण असते.(There is no failure only feedback).यशप्राप्ती करत असताना जर व्यक्ती मध्येच थांबली तर यास आपण अपयश असे न पाहता प्रत्यभारणाच्या दृष्टीने पाहिले तर आपण निराश,उदासीन वा तणावग्रस्त होण्याऐवजी आपण त्यातून नेमकं काय शिकलो,आपण कुठे कमी पडलो होतो, यातुन आपल्या कोणत्या क्षमतांना आव्हान मिळाले आहे, आपण त्या कशा विकसित करू शकतो,आपण कोणकोणत्या नवीन पर्यायांचा विचार करू शकतो या सारख्या असंख्य बाबींचा विचार करून पुन्हा जोमाने यशप्राप्तीकरिता झेप घेऊ शकतो.
            प्रत्याभरण सकारात्मकता दर्शविते तर अपयश नकारात्मकता. अपयशी समजले गेलेल्या घटनेकडे प्रत्यभारणाच्या दृष्टीने पाहणे व्यक्तीच्या धारणेत, विचारात व वर्तनात आमूलाग्र बदल घडविते व व्यक्तीस अशा अनपेक्षित घटनेसोबत दोन हात करण्यास अधिकतम ऊर्जा देऊन मानसिक बळ निर्माण करते शिवाय निश्चित केलेल्या ध्येयाकडे जाण्याचे नवीन मार्ग निर्माण करून अधिकाधिक क्षमतांचा विकास करते.

Let's replace failure with feedback to bounce back.

Mr. Abhijeet Manav.
(Mind trainer & NLP practitioner)



Wednesday, 14 November 2018

जशी दृष्टी तशी सृष्टी. ( Your perspective makes your world)

             जशी दृष्टी तशी सृष्टी

              भरदुपारी एक प्रवासी गावाच्या वेशीवर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकते सोबतच शंकेचे भाव दिसत होते. तो कोणालातरी शोधत होता इतक्यातच बाजूच्या शेतात एक वृद्ध काम करताना दिसला. तो लगेचच वृध्दाजवळ पोहचला व विचारले," या गावातील लोक कसे आहेत? मी सध्या जिथे वास्तव्यास आहे ते ठिकाण सोडून या गावात राहण्याचा विचार करतोय." वृद्ध जाणकाराने क्षणात प्रतिप्रश्न केला," तुम्ही जिथून येत आहात तिथले लोक कसे आहेत?" हा प्रश्न ऐकून प्रवाशाच्या चेहऱ्यावर पाश्चातापाचे भाव उमटले व रडक्या स्वरातच उत्तरला," मी आतापर्यंत वास्तव्य केलेल्या गावातील लोकांपेक्षा तेथील लोक हे सर्वात वाईट,हेकेखोर आणि दुष्ट आहेत. माझ्यासाठी तेथील वास्तव्यकाल हा सर्वात कटू अनुभव आहे." वृद्ध म्हणाला," या गावातही तुम्हाला तोच अनुभव येईल.इथेही तसेच वाईट लोक राहतात.हे ठिकाण तुमच्या वास्तव्यास योग्य नाही." प्रवाशी आपली शंका खरी ठरल्याच्या विश्वसाने पुढे चालता झाला.
    थोड्याच वेळाने असाच एक घोडेस्वार उत्सुकतेने आपल्या लवाजम्यासह गावाच्या वेशीवर उभा होता.त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य व आशावाद प्रकटपणे दिसत होता.त्याने जवळच असलेल्या वृद्धास पाहिले,वृध्दाजवळ जाऊन त्याला अभिवादन करून त्या गावात वास्तव्य करण्याच्या हेतूने गावातील लोकांबद्दल विचारणा करू लागला. वृद्धाने त्यास अगोदरच्या ठिकाणच्या लोकांबद्दल विचारले असता तो म्हणाला," खरे पाहता,ते ठिकाण सोडण्याची माझी इच्छाच नव्हती पण व्यवसायामुळे मला पुढे जावं लागतंय.तेथील लोक हे अत्यंत प्रेमळ,मनमिळावू व मदत करणारे आहेत.माझ्यासाठी ते नेहमीच अविस्मरणीय असतील." वृद्धाने त्याचे आनंदाने स्वागत केले व म्हणाला," तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. इथेही तशीच प्रेमळ व चांगले लोक राहतात.तुम्ही निश्चितच चांगला अनुभव घ्याल."
                     वरील दोन प्रकारच्या लोकांवरून हेच प्रतीत होते की इतर लोक हे त्याचप्रकारे असतात जसे तुम्ही स्वतः असता.असं म्हटलं जातं की कावीळ झालेल्या माणसाला संपूर्ण जगच पिवळं दिसतं अगदी तसंच आपण निराशा,उदासीनता,दुःख,द्वेष,अहंकार,खोटारडेपणा, अप्रमाणिकपणा या सारख्या व्याधींनी ग्रस्त असेन तर सगळं जगच त्याच व्याधींनी ग्रस्त झाल्यासारखं वाटतं. आपलं जग हे आपली दृष्टी ठरवत असते. तुम्ही ज्या प्रकारे लोकांशी वर्तन करता तसेच इतर लोक तुमच्याशी वर्तन करतात. भावना संसर्गजन्य असतात शिवाय त्या boomerang सारख्या फिरून आपल्याकडेच येत असतात. आपण प्रत्येकाने दुनियेबद्दल सतत सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तर संपूर्ण जग सकारात्मक बनायला वेळ लागणार नाही. चला तर सुरुवात स्वतःपासूनच आणि आतापासूनच करूयात...


Treat people the way you want to be treated.

Mr. Abhijeet Manav.
(Mind trainer & NLP practitioner)

Saturday, 10 November 2018

नवी दृष्टी ( Paradigm Shift)

                            नवी दृष्टी
              १९ वर्षाचा एक युवक धावत्या ट्रेनच्या खिडकीतून अतिउत्साहाने व हर्षोल्हासित होऊन बाहेरील दृष्य पाहत होता. तो आनंदाने टाळ्या पिटत होता, मध्येच ओरडत होता.त्याच्या चेहऱ्यावर लोकांना अत्यानंद झाल्याचा भाव दिसत होता पण त्याचे वय पाहता हे सर्वकाही सहप्रवासी लोकांना अनपेक्षित वाटत होते. त्याने आश्चर्यचकित होऊन आपल्या वडिलांकडे पाहिले व म्हणाला,"बाबा, पहा ना ही सर्व झाडे पाठीमागे जातायत आणि आकाशातील ढग आपल्यासोबत पळतायत." बाबांनीही चेहऱ्यावर मंद हसू आणत त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला.त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंदाचे भाव होते.ते दोघेही त्यांच्या विश्वात रममाण झाले होते, पण इतरांना मात्र मुलाचे हे वागणे समस्याप्रधान वाटत होते. जवळच बसलेल्या एका जोडप्याला तर त्या मुलाचा खूपच राग आला होता.त्याच्या ओरडण्यामुळे त्यांची चांगलीच चिडचिड झाली होती. न राहून त्यांनी मुलाच्या वडिलांना विचारले," तुम्ही, तुमच्या मुलाला एखाद्या चांगल्या दवाखान्यात का नाही दाखवत?" वडिल हसऱ्या चेहऱ्यानेच त्यांच्याकडे पाहून म्हणाले," हो, आम्ही आता थेट दवाखान्यातूनच येत आहोत ते ही डोळ्यांच्या.माझा मुलगा जन्मतः अंध होता. आजच त्याला नवीन दृष्टी मिळाली आहे.आज पहिल्यांदाच तो डोळ्यांनी हे जग पाहतोय."
               वडिलांचे हे शब्द ऐकून  सर्वांच्या मनात लज्जाभाव उत्पन्न झाला.आपल्या बाबतीत असे घडले असते तर आपणही असेच वागलो असतो असे सर्वांना वाटू लागले.त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाली. अगोदरच्या राग,चिडचिडेपणा व किळस या भावनांची जागा दया, करुणा व तदानुभवाने घेतली.
             आपल्यासोबतही असं बऱ्याचदा घडतं याच कारण म्हणजे आपण लोकांचं  केलेलं चुकीचं मूल्यमापन (judging). आपण कोणतेही वास्तव जाणण्याअगोदार लोकांच्या बद्दल मते बनवलेली असतात,गृहीतके मांडलेली असतात. लोकांच्या दिसण्यावरून, त्यांच्या कपड्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून,वागण्यावरून,आवडी-निवडी वरून त्यांची प्रतिमा(इमेज) आपण बनवलेली असते जी वास्तवाला धरून असत नाही.न्यूरोलिंगविस्टिक प्रोग्रामिंग मध्ये एक तत्व आहे, नकाशा म्हणजे भूप्रदेश नव्हे(The map is not the territory) अगदी त्याप्रकारेच व्यक्तीचे वर्तन,त्याचे दिसणे, त्याचे कपडे वा त्याचे बोलणे यांच्या मूल्यमापनाने व्यक्तीबद्दलचे आपण बनविलेले मत म्हणजे व्यक्ती असं होऊ शकत नाही. व्यक्तीच्या प्रत्येक वर्तनामागे एक कारण असते आपण ते जाणून न घेता फक्त वर्तनावरून त्यांच्यावर कोणताही शिक्का मारणं योग्य होणार नाही.
             लोकांच्या बद्दल बनवलेल्या चुकीच्या मतांमुळे त्यांच्या सोबत होणारी आंतरक्रिया ही प्रभावी,मानवी व फलदायी होणार नाही त्यामुळे सदृढ नातेसंबंध तयार होऊ शकत नाहीत. व्यक्ती, वस्तू किंवा घटना या बद्दलची आपण ठरविलेल्या मतांना छेद देणारी वास्तविक माहिती प्राप्त झाल्यावर आपले भावविश्व पूर्णपणे बदलते आपल्या मनातील राग ,द्वेष, ईर्षा,चिडचिडेपणा,अहंकार यासारख्या भावनांची जागा निश्चितच दया,करुणा, प्रेम,सहकार्य,मनमिळाऊपणा, यासारख्या उदात्त भावना घेतात यालाच प्रसिध्द प्रशिक्षक स्टीफन कोव्ही व्यक्तींमधील आमूलाग्र बदल (paradigm shift) असे म्हणतात. अश्या प्रकारचा आमूलाग्र बदल करणेसाठी आपण स्वतः किंवा इतरांनी ठरवून ठेवलेल्या मतांपेक्षा व्यक्तीच्या वर्तनामागील कारणापर्यंत पोहचायला हवे,वास्तव स्वरूपापर्यंत पोहचायला हवे तेव्हाच आपण समोरील व्यक्तीला खऱ्या अर्थाने समजून घेतलं अस म्हणता येईल. व्यक्ती व्यक्ती मध्ये गैरसमज निर्माण करणारी, व्यक्ती आकलनाला मर्यादा आणणारी व मानवातील मानवीयता संपवणाऱ्या अशा अंधदृष्टीपेक्षा आपणास प्रगल्भ करणारी नवी दृष्टी लाभावी व जगाकडे पहिल्यांदाच पाहण्याचा जो आनंद वरील युवकाला झाला तसाच आपणा सर्वांना व्हावा ही सदिच्छा!

No one can see the reality until opening the mind's eyes.

Mr. Abhijeet Manav.
(Mind trainer & NLP practitioner)

Thursday, 8 November 2018

वेदना आणि सुखाचे तत्व (pain and pleasure principle)

                      वेदना आणि सुखाचे तत्व
              (Pain & pleasure principle)

      जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर एका मुलाखतीत सांगत होता, जेव्हा तो वानखेडे स्टेडियम वर आचरेकर सरांच्याकडे सराव करायला दररोज सायंकाळी जात असे तेव्हा तो पाहत असे की त्याच्याच वयाची मुले मैदानाबाहेर मौजमजा करण्यात, भेळपुरी-पाणीपुरी खाण्यात दंग असायची त्याला सुद्धा हे सर्व करायची खूप इच्छा होत असे पण भविष्यात त्याचे तोटेही त्याला दिसत होते आणि म्हणूनच सचिनने मनमारुन खेळावर अधिक लक्ष दिले.सचिनच्या या निर्णयाचे फलित संपूर्ण जगाने पाहिले आहे. सचिनच्या जीवनातील या घटनेतून वेदना आणि सुखाचे तत्व समोर येते.
 काय आहे हे तत्व?प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात हे कसे  वापरते? याचे महत्त्व काय? हे समजावून घेण्यासाठी दररोज घडणारी काही उदाहरणे पाहुयात,
तुम्ही आजारी असताना (खास करून थंडी तापाने) कितीही वाटलं तरी आईस्क्रीम खाणं टाळता का?
परीक्षेच्या काळात झोप कमी घेता का?
कडाक्याच्या थंडीत सुद्धा मॉर्निंग वॉकला जाता का?
वरील प्रश्नांसाठी तुमचे उत्तर 'हो' असेल तर तुम्ही वेदना आणि सुख तत्वाला जवळून ओळखताय. माणसाकडून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णय व कृतीमागे हे तत्व असते.व्यक्ती दिवसागणिक अंदाजे 35000 निर्णय घेत असते पण यातील बहुतांशी निर्णय व त्यानुसार केले जाणारे वर्तन सवयीचे झालेले असते.ते अजाणतेपणी होत असते शिवाय त्यांचे परिणामही सवयीचे झालेले असतात त्यामुळे त्यांचा जीवनावर पडणाऱ्या प्रभावाची माणसाला फारशी जाणीव असत नाही. पण व्यक्तीकडून जाणीवपूर्वक घेतल्या जाणाऱ्या निर्णयामागे व कृतीमागे व्यक्ती वेदना व सुख तत्वाकडे  विचारपूर्वक पाहत असते.
मानवाचे मन हे नेहमीच वेदनेला टाळण्याच्या व सुखप्राप्तीच्या प्रयत्नात असते.ते बऱ्याचदा वर्तमानातील सुखाचा ध्यास घेत असते, पण त्याचवेळी फार कमी वेळा भविष्यात काय परिणामांना सामोरे जावे लागेल याचा विचार करते.व्यक्तीकडून अजाणतेपणी घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे व  वर्तनामुळे व्यक्तीला त्याच त्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागते तथापि भविष्यात या परिणामात अनुकूलता आणून सुख प्राप्त करणेसाठी प्रचलित धारणा, विचार पद्धती, निर्णय प्रक्रिया व  वर्तनामध्ये म्हणजेच प्रस्थापित प्रणालीमध्ये अनुरूप बदल करताना होणाऱ्या वेदनांचा स्वीकार करणे यास वेदना आणि सुखाचे तत्व म्हणतात.थोडक्यात भविष्यात सुखप्राप्ती व्हावी म्हणून वर्तमानात मनाच्या इच्छेविरुद्ध,आवडी विरुद्ध  जाऊन इच्छित सुखासाठी आवश्यक ती क्रिया करणे होय.वेदना आणि सुखाचे तत्व व्यक्तीला आपले निर्णय आणि वर्तन यांच्याकडे जागरूकपणे पाहण्यास भाग पाडते आणि व्यक्तींमधील आमूलाग्र परिवर्तनास निश्चित दिशा देते.
      तुमच्या वर्तमानकालीन जीवनात तुम्हाला ज्या ज्या गोष्टींपासून सुख प्राप्त होते आहे त्या सर्वांमागे भूतकाळात तुम्ही अल्पकालीन वेदनेचा निश्चितच अनुभव घेतला असणार आणि तुम्हाला आता ज्या ज्या गोष्टींचा पश्चाताप होतो त्या सर्वांमागे तुम्ही भूतकाळात अल्पकालीन सुखाला निश्चितच बळी पडलेले असणार यात शंका नाही.
       कित्येकदा व्यक्ती अल्पकालीन सुखाला बळी पडते व त्या करिता त्यास दीर्घकालीन वेदनेला सामोरे जावे लागते च्यापेक्षा त्या क्षणात व्यक्ती जर का जागरूक राहिली व वर्तनाचा भविष्यातील परिणाम पाहिला आणि वर्तन बदल करून अल्पकालीन वेदनेचा स्वीकार केला तर व्यक्तीस दीर्घकालीन सुख प्राप्ती होऊ शकते.

Pain(as is)...................Pleasure (as when)

Mr. Abhijeet Manav.
(Mind trainer & NLP practitioner)

Wednesday, 7 November 2018

यशाचे रहस्य

                            यशाचे रहस्य
 सॉक्रेटिस हा मानवजातीला प्रगतीची विचारधारा देणाऱ्यांपैकी एक जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता होता. तत्कालीन लोकांना तो त्यांच्या समस्यांवर उपाय सांगणारा आधारवडच वाटायचा. एके दिवशी भर दुपारी एक तरुण सॉक्रेटिस समोर येऊन उभा राहिला. सॉक्रेटिसने त्याचे येण्याचे कारण विचारताच त्याने सॉक्रेटिसला यशाचे रहस्य सांगण्याची विनंती केली. त्यावरती सॉक्रेटिस काहीच न बोलता त्यास दुसऱ्या दिवशी सकाळी गावाबाहेरील नदीकाठी भेटण्यास सांगून, त्यास यशाचे रहस्य सांगण्यास अनुमती दर्शवली.
          तरुणामध्ये आता चांगलाच उत्साह संचारला होता. त्यास यशप्राप्ती होण्याचा सहज,सोपा आणि हमखास मार्ग मिळणार याची मनोमन खात्री पटली होती. दुसऱ्या दिवशी सॉक्रेटिस व तरुण नदीकाठी भेटले. तरुणाने पुन्हा त्यांना यशाचे रहस्य विचारले तसे सॉक्रेटिसने तरुणाचा हात पकडला व त्यास नदीच्या पाण्यात घेऊन जाऊ लागला.जसे का ते दोघे पाणी गळ्याला लागेल इतक्या आत आले क्षणार्धात सॉक्रेटिसने तरुणाच्या मानेला घट्ट पकडले व त्यास पाण्यात बुडविले.प्रथमदर्शनी तरुणास काहीच कळले नाही.थोड्या वेळातच तरुणाचा कोंडमारा हाऊ लागला.तसा तो वरती येण्याचा प्रयत्न करू लागला पण सॉक्रेटिसने त्यास पूर्ण ताकदीने पुन्हा पाण्यात लोटले. तरुण खूपच तडफडू लागला तो जोर जोराने आपल्या संपूर्ण क्षमतेसह हालचाल करू लागला. सॉक्रेटिस त्याच्या संपूर्ण ताकदीने तरुणाला खाली दाबत होता.तरुण असह्य झाला.संपूर्ण प्राण एकवटून त्याने सॉक्रेटिसला बाजूला केले व वरती आला आणि जोर जोराने श्वास घेऊ लागला. तो पाण्यात गुदमरला होता.काही मिनिटातच तो पूर्वपदावर आला.त्याला सॉक्रेटिसला प्रचंड राग आला होता व रागातच त्याने सॉक्रेटिसला असे करण्यामागचे कारण विचारले. सॉक्रेटिसच्या चेहऱ्यावर मात्र शांतभाव होता, त्याने त्यास प्रतिप्रश्न केला," जेव्हा तु पाण्यात होतास तेव्हा तुला सर्वात जास्त कशाची गरज वाटत होती?" तरुण उत्तरला," मला कशाही पेक्षा श्वास घेण्याची गरज अधिक वाटत होती." सॉक्रेटिसने त्यास हेच यशाचे रहस्य असल्याचे सांगितले,"ज्याप्रकारे तुला पाण्यात श्वास घेण्याची तीव्र इच्छा होती तशीच तीव्र इच्छा जर का यशस्वी होण्यासाठी असेल तरच तू यशस्वी होऊ शकतोस." तरुणाला हे न पटेल तर नवलच त्याने सॉक्रेटिसला अभिवादन केले व यशाचे खरे गमक मिळवल्याच्या अविर्भावात निघून गेला.
    आपणही कित्येकदा यशाचा शॉर्टकट मिळतो का ते शोधत असतो,पण ते शक्य नाही. यशासाठी गरज आहे अपार कष्टाची,स्वतःला वाहून घेण्याची,संपूर्ण क्षमतेने झोकून देण्याची,मनापासून धडपडण्याची,जिंकत नाही तो पर्यंत लढण्याची,शेवटच्या क्षणापर्यंत आशावादी आणि सकारात्मक राहण्याची आणि जितकं जगण्यासाठी श्वास घेणं गरजेचं वाटतं तितकंच यशस्वी होणं गरजेचं वाटण्याची.

'Let's have a burning desire to succeed in life'

Mr.Abhijeet Manav.
(Mind trainer and NLP practitioner)

Tuesday, 6 November 2018

तुम्ही कोणाला भरवताय?

                  तुम्ही कोणाला भरवताय?
    एकदा आजोबा आपल्या सात वर्षाच्या नातवासोबत बागेत फेरफटका मारत होते. त्या दोघांमध्ये खूप चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता आजोबा म्हणाले, " माझ्या आतमध्ये एक भयंकर युद्ध सुरू आहे आणि तेही दोन कोल्ह्यामध्ये. त्यातील एक कोल्हा राग,अहंकार,पश्चाताप,दुःख,द्वेष,मोह, मत्सर,उदासीनता,निराशा,खोटेपणा,न्यूनगंड या सारख्या विध्वंसक विचार व भावनांचे प्रतिनिधित्व करतोय तर
        दुसरा कोल्हा आनंद,सुख,शांती,प्रेम,करुणा, सहकार्य,मानवता,प्रामाणिकपणा,उदारता,सहानुभूती यासारखाय जीवनाला उभारी देणाऱ्या विचार व भावनांचे प्रतिनिधित्व करतोय आणि महत्वाचे म्हणजे असे हे युद्ध तुझ्यात पण सुरू आहे शिवाय प्रत्येक माणसात सुरू आहे." थोडावेळ शांतता पसरली. काही पावले पुढे गेल्यावर तो बालक थांबला आणि आजोबांना त्याने प्रश्न केला," या दोन कोल्ह्यांपैकी कोणता कोल्हा हे युद्ध जिंकेल?". आजोबांनी थेट मुलाच्या डोळयात पाहिले व उत्तरले," ज्या कोल्ह्याला तुम्ही जास्त भरवाल तोच जिंकेल."
    खरं आहे आपल्यातील कोणत्या कोल्ह्याला जिंकवायच हे सर्वस्वी आपल्या नियंत्रणात आहे. या कोल्ह्याचे खाद्य म्हणजे आपल्या धारण आणि विचार आहेत.आपण सातत्याने कोणता विचार करतोय,स्वतःशी कोणत्या प्रकारे बोलतोय, कोणत्या प्रकारच्या भावनांना गोंजारतोय शिवाय कोणत्या प्रकारच्या घटना पाहतोय, काय वाचतोय,कुणाच्या संपर्कात राहतोय या सारख्या गोष्टींमधून त्यांना भरवलं जातंय.जर का आपण योग्य कोल्ह्याला योग्य खाद्य पुरवलं तर निश्चितच आपल्यातील योग्य कोल्हा जिंकेल आणि जीवनात सशक्त धारणा, सकारात्मक विचार, विधायक भावना व प्रभावी वर्तनाची नांदी होईल.

You become what you think.
          - Buddha

Mr. Abhijeet Manav.
        ( Mind trainer & NLP practitioner)