Thursday, 3 January 2019

HAVE AN OUTLET


                             प्रवाहित व्हा 
                       आपण सर्वांनी शालेय जीवनात मृत समुद्राचे नाव निश्चितच ऐकले असेल.वास्तविक तो एक खाऱ्या पाण्याचा अवाढव्य तलाव आहे ,ज्यात जॉर्डन नदीचे पाणी मिसळले जाते पण,या समुद्रात कोणत्याही प्रकारचे जीवन नाही.सामान्यपणे सर्वप्रकारच्या पाणी साठ्यांमध्ये आढळणारे लहान मोठे सजीव,मासे वा वनस्पती यापैकी काहीही या ठिकाणी आढळत नाही. यांतील क्षाराचे प्रमाण इतके प्रचंड आहे की मानवाचे शरीर यातील पाण्यावर सहजपणे तरंगू शकते.अशा प्रकारे कोणत्याही जीवनास प्रतिकूल असल्यामुळेच यास मृत समुद्र असे म्हटले जाते.
            या मृत समुद्राच्या अगदी जवळच उत्तरेला गॅलिलि नावाचा असाच भला मोठा समुद्र आहे की जो सर्व प्रकारच्या सजीवांच्या वाढीस अनुकूल असलेने तो जीवन संपन्न आहे. यात विविध प्रकारच्या रंगी बेरंगी वनस्पती व जलचर आढळतात. इस्रायलच्या विविध भागातून हजारो पक्षी या ठिकाणी स्थलांतरित होतात शिवाय अनेक प्रकारचे बगळे इथे पाहायला मिळतात. या गॅलिलि समुद्रातही जॉर्डन या नदीचेच पाणी मिसळले जाते.
        मृत समुद्र आणि गॅलिली समुद्र हे एकाच प्रकारच्या भूभागात आढळतात जेथील हवामान,तापमान व जमीन सारखीच आहे शिवाय दोघांमध्ये एकाच नदीचे पाणी मिसळले जाते मग एका समुद्रात जीवन आहे तर दुसऱ्यात कसलेच जीवन नाही, असे का?
         तर, गॅलिली समुद्रात एका मार्गाने येणारे पाणी समुद्रात मिसळल्यानंतर, दुसऱ्या मार्गाने बाहेर प्रवाहित केले जाते तर मृत समुद्रात पाणी स्वीकारले जाते पण कोणत्याही मार्गाने ते बाहेर प्रवाहित केले जात नाही.बाहेर टाकले जात नाही. ते एकाच ठिकाणी साठवले जाते यातील जवळपास ७ लाख टन पाण्याचे दररोज बाष्पीभवन होते यास्तव क्षाराचे प्रमाण अधिक होऊन जीवन निर्मितीची एकूणच संभाव्यता संपते.
        वास्तविक गॅलिली आणि मृत समुद्रातील फरक मानवाचे जीवन प्रगल्भ आणि सुखी करणारे एक तत्व शिकविते ते म्हणजे जीवनाचे सार हे फक्त घेण्यात वा स्वीकारण्यात नसून ते देण्यात,स्वीकारलेले पुढे प्रवाहित करण्यात आहे.
       जिवंतपणा एका अवस्थेत थांबून साठवण्यात,स्वतःपर्यंत मर्यादित ठेवण्यात नसून सतत प्रवाहित असण्यात आहे. जॉर्डन नदीच्या अविरत चाललेल्या प्रवाहाप्रमाणेच आपल्याही जीवनात खूप सुंदर गोष्टी येत सतत येत असतात, जसे लोकांकडून मिळणारे प्रेम ,आदर,मान- सन्मान,आपुलकी,स्नेह,मदत,
आधार तसेच त्यांच्या सहवासातून मिळणारे ज्ञान,आनंद, सुख,शांती व समाधान या सगळ्यांचा खरा आस्वाद तोच घेऊ शकतो जो हेच ज्ञान, प्रेम,आदर व समाधान आपल्या वागण्या बोलण्यातून म्हणजेच दररोजच्या कृतीयुक्त व्यवहारातून इतरांपर्यंत प्रवाहित करून इतरांच्या जगण्यात जिवंतपणा निर्माण करतो.
         असं म्हटलं जातं की सुख वाटल्याने वाढते. आपण आपल्या वाट्याला आलेले सुख वाटून स्वतःही सुखी होवूयात व इतरांनाही सुखी करूयात, प्रवाही होऊयात. वाहत राहूयात...

Give a lot to receive a lot....


Mr.Abhijeet Manav.
(Mind trainer & NLP practitioner)

Read my other blogs to receive more...

1 comment: