स्वयंप्रेम
तुम्ही जेव्हा 'प्रेम' हा शब्द ऐकता तेव्हा तुम्हाला काय आठवतं? नक्कीच तुम्हाला बरंच काही आठवत असेल. गुलाबाचं फूल, बदामाचा आकार आणि त्याच्यात घुसलेला तीर, कधीही न विसरता येणारे चेहरे, गमती जमती आणि बरंच काही,होय ना? वास्तविक प्रेम या भावनेची व्याप्ती आपण नेहमीच मर्यादित आणि संकुचित ठेवली आहे. प्रेमाचा संबंध हा केवळ आपण इतरांवरती जे प्रेम करतो एवढाच जाणतो पण याच्याही पुढं जाऊन आपल्या जीवनाला आकार देणारे, आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करणारे व जीवना बद्दल अधिक सकारत्मक बनवणारे स्वयंप्रेम (self love) म्हणजेच स्वतःच स्वतःवर प्रेम असण्याच्या भावनेपासून कोसो दूर आहोत.आणि म्हणूनच तुम्ही कोणावर प्रेम करता? या प्रश्नाचे उत्तर हे नेहमीच इतर कुणाचे तरी नाव असते. कित्येकदा स्वतःला विसरून इतर कोणावर किती आणि कसे प्रेम केले होते या बद्दल भरभरून बोलणारे कित्येक आढळतात, पण तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? आणि स्वतःवर प्रेम करता हे दर्शविणाऱ्या काही गोष्टी सांगा? हे प्रश्न लोकांनां निश्चितच गोंधळात टाकतात, खरंय ना? तुम्ही हे प्रश्न स्वतःला विचारून पहा,काय होतंय ते? तुम्हाला माझे म्हणणे निश्चित पटेल.
आपल्या दैनंदीन जीवनातील सामान्य व्यवहारापासून ते जीवन हेतू साध्य करून जीवनात यशस्वी होण्यापर्यंत स्वयंप्रेम महत्वाची भूमिका बजावते.
समाजात वावरत असताना इतरांशी स्नेहपूर्ण नातेसंबंध प्रस्थापित करणे हे जीवन ध्येये साध्य करण्यासाठी आवश्यक असते पण तुमचे स्वतःचे स्वतःशीच असणारे संबंध प्रेमाचे नसतील तर तुम्ही इतरांशी स्नेहपूर्ण संबंध कसे साधाल? जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करू शकत नाही ती व्यक्ती इतरांवर विषय वासनेच्या पलीकडे जाणारे निर्मळ प्रेम कशी करू शकते? व्यक्ती सामर्थ्याची सार्थकता होण्यासाठी व्यक्तीचे स्वतःवर प्रेम (self love) असणे खूपच आवश्यक आहे. जीवनातील चढ उतारांना सामोरे जाण्यासाठी, आव्हानांना सहजतेने पेलण्यासाठी व ऊर्जेचा स्रोत सतत वाहत ठेवून सकारत्मक जीवन जगण्यासाठीचे आत्मबल स्व-प्रेम निर्माण करते.
आपण स्वतःवर नेहमीच प्रेम करत असतो पण त्याची जाणीव फार कमी लोकांना असते. त्याची खोलवर जाणीव होण्यासाठी व स्वयं-प्रेमाच्या अविष्कारातून जीवन विकास साधण्यासाठी खालील गोष्टींचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे.
*स्वतःला स्वीकारा:-*
प्रत्येक व्यक्ती अद्वितीय असते आणि कुणीही परिपूर्ण असत नाही. प्रत्येकामध्ये जसे गुण असतात तसे काही अवगुणही असतात.स्वतःला स्वतःतील गुणदोषासह स्वीकारले पाहिजे.
*स्वतःतील चांगल्या गोष्टी लक्षात घ्या:-*
स्वतःचा गुणदोषासह स्वीकार करायलाच हवा पण तुम्ही स्वतःतील चांगल्या गोष्टींची जाणीवपूर्वक नोंद घ्यायला हवी. तुमच्यातील गुणांची यादीच बनवा आणि त्याद्वारे तुमच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचीही नोंद ठेवा.तुमच्यात असणाऱ्या हजारो चांगल्या गोष्टी तुमच्यातील स्व-प्रेम वृद्धिंगत करतील.
*कुणाशीही तुलना करू नका:-*
इतरांशी तुलना करणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा अपमान करणेच आहे. इतरांशी तुलना करून स्वतःच्या कमकुवतपणा बद्दल निराश होऊन स्वतःला हीन लेखू नका तर स्वतःतील अद्वितीय क्षमतांचा विचार करा.
*इतरांच्या नकारात्मक टिकेपासून स्वतःचे संरक्षण करा:-*
लहानपणा पासून तुम्हाला तुमच्यातील वाईट गोष्टीच (नसलेल्याही)अधिक प्रमाणात सांगण्यात आलेल्या आहेत.तुमचे कुटुंब,मित्र संवगडी,शिक्षक अशापैकीं अनेकांनी तुमच्या दिसण्यापासून वागण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर टीका केलेली आहे. तुमच्यातील उणिवांवर त्यांनी नेहमीच बोट ठेवलेलं आहे आणि त्यामुळेच तुम्ही स्वतःचा तिरस्कार करता. लोकांचे तुमच्या बद्दलचे नकरात्मक मत हा त्यांचा विचार असतो ते वास्तव वा सत्य असत नाही. इतर तुमच्या बद्दल शंका व्यक्त करतात किंवा तुमच्या क्षमतांवर अविश्वास दाखवतात म्हणून स्वतःचा तिरस्कार करू नका. स्वतःबद्दलची वास्तववादी सकारत्मक मते बनवा व त्यांच्याशी ठाम रहा.
*स्वतःचे कौतुक करायला शिका:-*
बऱ्याचदा इतरांनी तुमचे कौतुक केले तरी त्याचा स्वीकार करताना तुम्ही आढेवेढे घेता,होय ना? इतरांकडून होणाऱ्या कौतुकाचा नम्रपणे स्वीकार कराच शिवाय तुमच्या कडून झालेल्या चांगल्या कामाबद्दल स्वतःचे कौतुक करा. स्वतःलाच एखादे छोटेसे बक्षीस द्या. स्वतःच्या चांगल्या कामाबद्दल स्वतःलाच दिलेले अगदी १ रुपयाचे चॉकलेट देखील तुमचे स्व-प्रेम विकसित करेल,अगदी खात्रीशीर.
*स्वयंसूचना द्या:-*
दुसऱ्यांनी केलेल्या टिकेपेक्षा आपण त्यावरती स्वतःला काय सांगतो? स्वतःशी काय बोलतो हे खूप महत्त्वाचे आहे. हे स्वतःशी बोलणेच म्हणजे स्वगत सकारत्मक व प्रभावी व्हायला हवे.तुमच्यातील सामर्थ्याच्या अनुषंगाने सकारत्मक स्वयंसूचना घ्या.
स्वयंप्रेम म्हणजे स्वार्थी होणे अस नाही तर स्वतःबद्दल कळकळ असणे,स्वतःची काळजी घेणे,स्वतःचा आदर करणे आणि आत्मसन्मान जपणे आहे. स्व-प्रेम हे व्यक्तीला निराशा, खिन्नता,उदासीनता आणि मानिसक खच्चीकरण यापासून दूर ठेवणारे प्रभावी शस्त्र आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुले व्यक्तीला बऱ्याचदा विनाकारण उद्भवलेल्या मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यातून व्यक्तीला जीवन अर्थहीन वाटायला लागतं अशावेळी स्वयंप्रेमाची जाणीव व्यक्तीला जीवन संजीवनीच आहे यात शंका नाही.
तुम्ही स्वतःवर भरभरून प्रेम करावे आणि तुमचे जीवन सुखी,आनंदी व समाधानी व्हावे ही सदिच्छा!🌺🌺🌺
लेखन:-
श्री. अभिजीत मानव
(लाईफ कोच,एन.एल.पी. प्रॅक्टिशनर आणि मोटिव्हेशल स्पीकर)
अधिक माहिती करिता आणि प्रशिक्षणाकरिता आवश्य संपर्क करा...
9503839760
abhijeetmanav.blogspot.com
www.exceltrainings.in
