Friday, 7 December 2018

TRUE HAPPINESS

                खरा आनंद
                     बऱ्याचदा अस होत की एखाद्या चित्रपटातील मुख्य कलाकारापेक्षा त्यातील एखादा सह कलाकार लोकांच्या अधिक लक्षात राहतो आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्या चित्रपटाविषयी बोलता तेव्हा तुम्हाला त्यातील मुख्य कलाकारापेक्षा तो सह कलाकारच आठवतो, खरंय ना? असच काहीतरी होत जेव्हा जेव्हा आपण 2004 अथेन्स ऑलिम्पिक मधील मॅरेथॉन ची स्पर्धा आठवतो.या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येऊन सुवर्णपदक कोणी मिळविले हे लोकांना आठवत नाही पण ज्याने तिसऱ्या क्रमांकावर येऊन कांस्य मिळविले तो वंदेरली डे लिमा मात्र संपूर्ण खेळजगताला प्रकर्षाने आठवतो आणि मुख्य म्हणजे त्याच्या खिलाडू वृत्तीसाठी,सकारात्मकतेसाठी आणि सामान्यालाही जीवनाकडे पाहण्याचा उचित दृष्टीकोन देण्यासाठी.
         ही घटना आहे 2004 ऑलिम्पिक मधील 38 किमी च्या मॅरेथॉन ची. ब्राझीलचा डे लिमा हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता आणि स्पर्धेत तो त्याच त्वेषाने पळत देखील होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या प्रेक्षकांना हे पूर्णपणे कळले होते की आता काही मिनिटातच लिमा ही मॅरेथॉन जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरणार. तो इतर स्पर्धकांपेक्षा 48 सेकंद पुढे होता आणि त्याचा वेग पाहता तोच जिंकेल याची खात्री होती पण 35 किमीच्या टप्प्यावर काही अनपेक्षितच घडले. प्रेक्षकांपैकी एकाने डे लिमाला मध्येच पकडले व ट्रॅकच्या बाजूला नेले. बाजूला उभ्या असलेल्या काही प्रेक्षकांनी त्याची सुटका केली पण या झटापटीत लिमाला थोडीशी दुखापतही झाली होती व त्याने आपल्या आघाडीतील 20 सेकंदही गमावले होते,ज्यामुळे इतर स्पर्धक त्याच्या पुढे गेले होते.  लिमाने झालेल्या घटनेचा अधिक विचार न करता पुन्हा जोरात मुसंडी मारली व तिसऱ्या क्रमांकावर स्पर्धा पूर्ण करून कांस्य पदक मिळविले होते.
   लिमाने हातचे सुवर्णपदक गमावले होते पण त्याच्या पश्चातापाचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. आपण स्पर्धा पूर्ण केली व एक पदकही मिळवल्याच्या आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.डे लिमाचे उदाहरण म्हणजे आपण जे काही गमावले आहे त्या पेक्षा काय कमावले आहे त्याचा आनंद सोहळा कसा साजरा करायला हवा याचे उत्तम उदाहरण आहे. त्याचे उदाहरण केवळ खेळापूरते मर्यादित राहत नाही तर ते संपूर्ण जीवनाला स्पर्श करते आपण आपल्या सर्वोत्तम क्षमतेनुसार संकटावर मात करून मिळवलेले यश किती सुंदर असू शकते हेच यातून दिसते.
         जीवनात बऱ्याचदा दुसऱ्याशी स्पर्धा करण्याच्या नादात आपण मिळवलेले यश देखील आपणास दिसत नाही. दुसऱ्याशी तुलना करण्याने आपला आनंद आपणच आपल्याकडून हिरावून घेत असतो हे न कळण्या इतपत आपण निर्बुद्ध होतो. प्रत्येकवेळेला लोकांनी आपणाला लक्षात घायलाच हवं,आपणाला कुणीतरी ओळखायलाच हवं,आपल्या बद्दल चांगलं बोलायलाच हवं यासारख्या खुळचट कल्पनांमुळे सहज जगण्याला आपण अवघड आणि क्लिष्ट करतो. जगण्यातला खरा आनंद हा आपणच आपणाला ओळखण्यात आणि आव्हानांनाही सकारत्मकतेन सामोरे जाण्यात आहे याची अनुभूती डे लिमाच्या जगण्यातून येते.

Mr. Abhijeet Manav.
(Mind trainer & NLP Practitioner)

No comments:

Post a Comment