संभाषण कला
संभाषण हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. प्रत्येक माणसाला आपल्या मनोशारीरीक गरजा भागविण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते आणि त्याकरिता त्यास सतत इतरांशी आंतरक्रिया करावी लागते. ही आंतरक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात संभाषणाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. माणसाच्या मनात सतत प्रवाहित होणाऱ्या विचारांना व त्यातून निर्माण होणाऱ्या विविध भावना, कल्पना व दृष्टिकोन यांना सहज व्यक्त करता येणे निरोगी व विकसित जीवनासाठी अत्यावश्यक असते. ही व्यक्त होण्याची प्रेरणाच संभाषणाचे मूळ आहे. तसे पाहता संभाषण ही प्रत्येक मानवाची सहज प्रवृत्ती आहे. पण ते अधिक फलदायी, प्रभावी आणि उत्कृष्ट होण्यासाठी व्यक्तीला विशेष प्रयत्न करावे लागतात. संभाषण प्रक्रियेकडे ती एक कला आहे वा कौशल्य आहे या दृष्टिकोनातून पहावे लागते व त्या करीता आवश्यक असणाऱ्या क्षमता व गुणधर्म विकसित करावे लागतात. प्रभावी संभाषणामुळे सामाजिक आंतरक्रिया अधिक सुलभ आणि अधिक फलदायी होतात यात शंका नाही. व्यक्तीला व्यक्तिगत,सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी संभाषण कला अवगत व्हायलाच हवी. या करता तिला संभाषण प्रक्रिया आणि या कला अवगत करण्यासाठी आवश्यक गोष्टी समजावून घ्याव्या लागतील.
संभाषण प्रक्रिया ही द्विमार्गी असते. या करिता दोन किंवा त्यापेक्षा अधिक सहभागीची आवश्यकता असते. ही प्रक्रिया खालील टप्प्यात घडते.
१. संदेशाची बांधणी:- यात व्यक्ती ज्या संदर्भात व्यक्त व्हायचे आहे त्या बद्दल विचार करून त्यांना संघटित करते व त्यांना योग्य शब्दाकार देऊन शाब्दिक किंवा अशाब्दीक संदेश तयार करते.
२. माध्यमाची निवड:- संदेशाचे स्वरूप म्हणजेच तो शाब्दिक आहे की अशाब्दीक व संदेश ग्रहनकर्ता यांचा विचार करून माध्यमाची निवड होते. जसे शाब्दिक असेल तर बोलणे वा लिहिणे याचा वापर होतो तर अशाब्दीक असेल तर शारीरिक अवयवांचा वापर होतो. याशिवाय त्याकरिता पत्र, ईमेल,टेलिफोन वा प्रसार माध्यमे यांची माध्यम म्हणून निवड केली जाते.
३. संदेशाचे ग्रहण:- संदेश ग्राहनकर्ता आलेल्या संदेशाचे पूर्वानुभव व विचारक्षमता यांच्या जोरावर संदेशाचे आकलन करून घेते.
४. प्रतिसाद:- संदेश ग्राहनकर्ता त्याला समजलेल्या संदेशावर त्याच्या कुवतीनुसार प्रतिसाद देतो.
५. प्रतिसादाची पडताळणी:- आलेला प्रतिसादवरून संभाषणाचा हेतू साध्य झाला आहे की नाही याची पडताळणी होते व पुन्हा संभाषण चालू ठेवायचे वा खंडित करायचे याचा विचार होतो.
(वास्तविक संभाषणाची सार्थकता ही ज्या हेतूने संभाषण सुरू केले होते त्याच्या पूर्ततेत असलेने जो पर्यंत तो हेतू साध्य होत नाही तो पर्यंत विविध मार्गांनी संभाषण चालूच ठेवावे त्याकरिता संभाषण कर्त्यांनी लवचिकतेच्या तत्वाचा अंगीकार करावा.)
संभाषण प्रक्रिया व त्यातील टप्पे यांची समज व्यक्तिमध्ये त्याबाबतची सजगता निर्माण करते व प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीची भूमिका काय आणि कशी असायला हवी याबद्दल योग्य दिशादर्शन करते.
संभाषण कला ही प्रत्येक व्यक्तीला सहज साध्य करता येण्याजोगी आहे. त्याकरिता व्यक्तीस संभाषणाची पंचसूत्री निश्चित मदत करेल.
पंचसूत्री:-
१. ऐकण्याची कला हस्तगत करा:-
ऐकणे ही सहज घडणारी क्रिया असली तरी काय आणि कसं ऐकायचं हे मात्र शिकावं लागत. बऱ्याचदा संभाषण म्हटलं की लोकांना फक्त बोलणेच महत्वाचे वाटते पण या प्रक्रियेत बोलण्यापेक्षाही ऐकण्याला अधिक महत्व आहे. अस म्हटलं जातं की माणसाला तोंड एकच आहे पण कान मात्र दोन आहेत कारण की त्याने जेवढे बोलावे त्याच्या दुप्पट ऐकावे. होय, हे खरे आहे. उत्कृष्ट संभाषणकर्ते अधिक ऐकतात. समोरचा व्यक्ती बोलत असताना ते त्याच्याशी, त्याच्या बोलण्याशी ऐकण्याच्या माध्यमातून एकरूप होतात.बोलणारा फक्त शब्द फेकत नसतो तर तो आपल्या भावना व्यक्त करत असतो म्हणून त्यांचे योग्य आकलन होण्यासाठी व्यक्तीने लक्षपूर्वक(Attentive)व तन्मयतेने ऐकायला हवे. बोलणाऱ्याच्या अनुभवला त्याच्या नजरेतून पहावे. त्याच्या बद्दल तदानुभूती बाळगावी. बऱ्याचदा लोकांना ऐकलं जात नाही म्हणून लोक व्यक्त होत नाहीत पण संभाषणाच्या माध्यमातून नातेसंबंध अधिक दृढ होण्यासाठी समोरच्याला ऐकणं महत्त्वाचे आहे.
२. संभाषणाचा हेतू कल्याणकारी असावा:-
प्रत्येक विचारामागे व तो व्यक्त करीत असताना वापरल्या जाणाऱ्या शब्दमागे काही ना काही हेतू असतोच. जर का हेतू टीका करण्याचा,तक्रारीचा,दोष देण्याचा,अपमान करण्याचा, बदनामी करण्याचा असेल तर असे संभाषण चांगले असणार नाही. हेतू हा योग्य व खरी माहिती पोहचविण्याचा, लोकांना प्रोत्साहित करण्याचा,प्रेरीत करण्याचा,लोकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा,आदर व्यक्त करण्याचा, समजावून सांगण्याचा, आनंदी बनविण्याचा असायला हवा. हेतू चांगला असेल तर शब्दाची निवडही चांगलीच असेल परिणामी संभाषण ही चांगलेच असेल.
३. 'काय' पेक्षा 'कसे' हे लक्षात घ्यावे:-
संभाषणामध्ये 'काय?'चा संबंध हा विषयाशी व त्या संबंधी वापरल्या जाणाऱ्या शब्दांशी असतो तर 'कसे?'चा संबंध ते शब्द कशा पद्धतीने वापरले जाणार आहेत याच्याशी असतो. एक संशोधनानुसार संभाषणामध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांना केवळ ७% इतकेच महत्व असते तर ते कश्या पद्धतीने व्यक्त केले जातात यास ९३% इतके महत्व आहे. यामध्ये ३८% आवाज, त्यातील चढ-उतार, लय बद्धता तर ५५% भाग हा अशाब्दीक म्हणजेच शारीरिक भाषेचा आहे. म्हणूनच प्रभावी संभाषणामध्ये आवाज, चेहऱ्यावरील हावभाव,हातवारे आणि संपूर्ण शरीराची हालचाल योग्य संदेश पोचवु शकतात. एकूणच संभाषणामध्ये शब्द 'कसे' बोलले जातात यास विशेष महत्व आहे.
४.लोकांची माहिती ग्रहण करण्याची प्रणाली समजून संभाषण करा:-
प्रत्येक व्यक्तीची उपलब्ध झालेली माहिती समजून घेण्याची एक विशिष्ट प्रणाली असते,म्हणजे काही लोकांना चित्र स्वरूपातील माहिती अधिक चांगली समजते; त्यास व्हिज्युअल असे म्हणतात, काहींना श्रवणाशी संबंधित शब्द किंवा आवाजातील विविधता यातून चांगला बोध होतो, यास ऑडिटोरी असे म्हणतात तर काहींना प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून चांगले ग्रहण होते त्यास काईनेस्थेटीक असे म्हणतात. तुम्ही संदेश स्वीकारणाराची प्रतिनिधित्व प्रणाली ( Representational System) ओळखून संभाषण केले तर ते अधिक प्रभावी ठरते. शिवाय उत्कृष्ट संभाषण हे व्हिज्युअल, ऑडिटोरी आणि काईनेस्थेटिक या सर्वांचे उत्कृष्ट मिश्रण असते.
५. छाप पाडण्यासाठी नाही तर व्यक्त होण्यासाठी बोला:-
बऱ्याचदा लोक इतरांच्यावर छाप पाडण्यासाठी बोलताना दिसतात. अशा वेळी व्यक्ती जड व अलंकारिक शब्दांचा अधिक वापर करते, परिणामी लोक अशा दांभिक लोकांपासून दूर जातात. लोकांना समजेल, त्यांच्या मनाचा ठाव घेईल अशी भाषा वापरणे योग्य आहे. मनातील विचार अगदी सहजच कसे इतरांपर्यंत पोहचवले जातील हे लक्षात घ्यायला हवे. परिणाम कारक संभाषण साधनेसाठी समोरील व्यक्तीचे लिंग,वय, शैक्षणिक पात्रता शिवाय सांस्कृतिक वारसा याचाही विचार करणे आवश्यक आहे.
बदलणारी जीवन शैली, वाढणारी स्पर्धा, प्रसार माध्यमाचा वाढता प्रभाव आणि या मुळे माणसा माणसातील वाढता तणाव व नाते संबंधातील दुरावा कमी होण्यासाठी तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला आज संभाषण कला अवगत करणे गरजेचे आहे. संभाषणाची प्रक्रिया आणि पंचसूत्री आपणास उत्कृष्ट संभाषणकर्ता बनवेल याची मला पूर्ण खात्री आहे.
लेखन:-
अभिजीत मानव
(लाईफ कोच, माईंड ट्रेनर आणि मोटिव्हेशनल स्पीकर)
9503839760
www. exceltrainings.in

संभाषणाचे महत्व आणि ते कसे विकसित करता येईल हे खूपच सुंदर शब्दांत व्यक्त केलेले आहे. धन्यवाद सर.
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteGreat work Abhijeet Sir well done and all the best
ReplyDeleteNice sir
ReplyDelete