Saturday, 4 January 2020

SELF RESPONSIBILITY


              

                          
  जबाबदारी कोणाची?

तुम्हाला तुमचं इच्छित जीवन जगण्यापासून कोण थांबवतय?
         १)तुमचं कुटुंब?
        २) तुमचा बॉस?
        ३) तुमचा पती?
        ४)तुमची पत्नी?
        ५)तुमच्या भोवतालची माणसे?
        ६) तुमचं शिक्षण?
        ७)तुमची आर्थिक बाजु?
                                          वरील प्रश्नाच्या उत्तरादाखल तुमच्याकडे वरीलपैकी एक किंवा आणखीन वेगळं कारण असेल तर तुम्ही कधीच तुम्हाला इच्छित जीवन जगू शकत नाही. तुम्हाला इच्छित  जीवन जगण्यापासून थांबवणारे कोण असेल तर ते तुम्ही स्वतः आहात, हो! हेच सत्य आहे. हे पटत नसेल तर तुम्ही स्वतःची जबाबदारी घेण्यापासून दूर पळताय.
                स्वतःला अपेक्षित असलेलं समृद्ध , सुखी ,आनंदी व समाधानी जीवन घडवण्याची संपूर्ण जबाबदारी हि व्यक्तीची स्वतःची आहे. हे एक मूलभूत तत्व आहे कि ज्यामुळे जीवन जगत असताना आपल्या वाट्याला येणारे अपेक्षित - अनपेक्षित अनुभव , चांगल्या - वाईट घटना , स्वतः व इतरांकडून केल्या जाणाऱ्या क्रिया शिवाय स्वतः व  इतरांनी दिलेल्या प्रतिक्रिया, आपण केलेले वर्तन,घेतलेले निर्णय  व त्यामुळे हाती पडलेले निकाल आणि या सगळ्यांमधून निर्मित जीवनाला आपण स्वतःच जबाबदार आहोत याची प्रचिती येते.
                                    व्यक्ती बऱ्याचदा स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या  वाईट  घटनांना व अनुभवांना नशीब, दैव,भाग्य  यांची लेबल्स लावून संपूर्ण जीवनाची जबाबदारी देवावर टाकून हतबल हताश व निराशामय जीवन जगतो. आपल्या वाट्याला आलेलं सर्वकाही हे आपल्या मागील जन्मातील पापकृत्याचे वाईट कर्माचे फळ आहे, हे अगोदरच लिहून ठेवलय, जे होत आहे तेच योग्य आहे,हे असच चालणार, हे मी बदलू शकत नाही असा कुचकामी निराशावादी विचार व्यक्तीला स्वजबाबदारी पासून दूर लोटतो. व्यक्तीला सद्यस्थिती बदलण्याचा विचारही मनाला शिवत नाही व ती व्यक्ती तसा प्रयत्नही करत नाही.
             आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेस आपणच जबाबदार आहोत आपले विचार भावना दृष्टिकोन व वर्तन जबाबदार आहे याची पूर्ण जाणीव होऊन त्या नकारात्मक बेजबाबदार विचार, दृष्टिकोन,धारणा व वर्तन यांना  सकारात्मक बाजू देऊन जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणे मानव्याच्या विकासातील पहिली पायरी आहे. जीवनाची १००% जबाबदारी स्वीकारताना कुटुंब, मित्र, समाज, नातेवाईक,भोवतालची आर्थिक,राजकीय व धार्मिक परिस्थिती यांना दोष देणे व त्याबद्दल निरर्थक तक्रार करणे थांबवायला हवं. लोक माझा फायदा घेतात, मला बळीचा बकरा बनवलं,मला लोकांनी त्यांच्या फायद्या करीत वापरलं, मला भावनिक बनवलं अशा नकारात्मक विचारांना तिलांजली द्यायला हवी. तुमच्या बाबतीत घडलेल्या कोणत्याही घटनेबद्दल इतरांना दोष देण्यात किंवा त्याच्याविषयी तक्रार करण्यात काहीही हशील नाही कारण ......
हे तुम्ही आहात ज्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतले नाहीत ...
हे तुम्ही आहात ज्यांनी इतरांना बोलण्याची संधी दिलीत...
हे तुम्ही आहात ज्यांनी शिस्त पाळली नाही...
हे तुम्ही आहात ज्यांनी वेळेवर काम पूर्ण केलं नाही....
हे तुम्ही आहात ज्यांनी इतरांना नेहमीच खुश ठेवण्याचा चंग बांधला होता...
हे तुम्ही आहात ज्यांनी स्वतःचे आरोग्य जपले नाही....
हे तुम्ही आहात ज्यांनी आळसाला मित्र केलं आहे...
 हे तुम्ही आहात ज्यांनी वेळेला कधीच महत्व दिल नाही....
हे तुम्ही आहात ज्यांनी सहनशील असल्याचा आव आणला होता...
हे तुम्ही आहात ज्यांनी इतरांना तुमच्याशी सलगीने वागायची परवानगी दिली होती...
हे तुम्ही आहात ज्यांनी खोटं बोललेलं होत....
हे तुम्ही आहात ज्यांनी स्वतःला कधीच बदलण्याचा प्रयत्न केला नाही...
                          अशा कित्येक गोष्टी तुम्ही करत आलेल्या आहात कि ज्याचा परिणाम म्हणजे तुमची आजची केविलवाणी अवस्था आहे आणि हे दुसरं कोणीही बदलू शकत नाही तुमच्याशिवाय, खरंय ना?
            जीवनात घडणाऱ्या काही घटनांवरती आपले नियंत्रण असते पण काही घटना नियंत्रणबाह्य असतात अशा घटनांबद्दल उद्विन्ग होवून स्वतःला अहितकारक प्रतिक्रिया देण्यापेक्षा योग्य प्रतिक्रिया देवून त्यांना सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे कारण वर्तमान काळात दिलेल्या याच प्रतिक्रियांमधून भविष्यातील परिणामांना आपण अनुभवणार आहोत आणि म्हणूनच त्याची जबाबदारी आताच घेऊन आपण योग्य ते वर्तन करणे गरजेचं आहे.
                इंग्रजीमध्ये असं म्हटलं जात कि you can’t hire someone else to do push ups for you याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे कि तुमचं काम तुम्हालाच करावं लागेल तेव्हाच सुखी, आनंदी,समाधानी व समृद्ध जीवनाची इच्छा तुम्ही करू शकता. जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणे म्हणजे कोणते आव्हान स्वीकारणे वगैरे असं अजिबात नसून मानवी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे व आपल्यातील उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन ठरवलेले जीवित ध्येय साध्य करण्यास आपल्यातील सुप्त क्षमतांना जागृत करून त्यांना योग्य दिशेने मार्गक्रमण करणे असे म्हणता येईल. विनाकारण तक्रार करणे, चुकीच्या ठिकाणी तक्रार  करणे व निमित्त करून ध्येयपूर्तीसाठी आवश्यक कार्यामध्ये टाळाटाळ करणे  यांसारख्या गोष्टींपासून जाणीवपूर्वक मुक्तता मिळवून जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी.
                           स्वामी विवेकानंदानी तर म्हटलेच आहे कि 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस 'आपण आपल्या जीवनाचं शिल्प कस आणि किती सुंदर करायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.हे जीवनशिल्प एकतर सुंदर असेल किंवा कुरूप असेल. हे अवलंबून आहे आपले विचार , कल्पना,भावना , दृष्टिकोन ,धारणा ,मते, सवयी व यामधून निर्माण होणाऱ्या वर्तनावर व त्यातून घडणाऱ्या परिणामांवर.  ते शिल्प अधिकाधिक सुंदर आकर्षक सुरेख आणि समृद्ध होण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्न करायला हवेत आणि हे सहज शक्य आहे जर आपण तयार आहोत,जीवनाची १००% जबाबदारी घ्यायला.

 लेखन:-
अभिजीत मानव
(लाईफ कोच,माईंड ट्रेनर आणि मोटिव्हेशनल स्पीकर)
Excel Training System
9503839760
abhijeetmanv.blogspot.com
www.exceltrainings.in

1 comment: