Sunday, 16 February 2020

GROWTH MINDSET




ग्रोथ माईंडसेट
                           जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व स्रोत(क्षमता) व्यक्तीमध्ये मूलतःच असतात,हे सर्वमान्य आहे. असे असताना, ठराविक लोकच जीवनात यशस्वी का होतात? आणि त्यापैकी बऱ्याच लोकांबद्दल इतरांनी, ते काहीच हाशील करू शकणार नाहीत असे भाकीत करूनही यशस्वी झालेत. हे निश्चितच विचारात घेण्याजोगे आहे. या प्रश्नाच्या  मुळाशी गेल्यास आपल्या हाती अनेक कारणे लागतात पण या सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, व्यक्ती तिच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांकडे कशी पाहते, त्या बद्दल काय विचार करते, कोणता दृष्टिकोन ठेवते यावरच खऱ्या अर्थाने यश अवलंबून असते. 
                         स्टँडफर्ड विद्यापीठातील प्राध्यापिका व मानसशास्त्रज्ञ डॉ. कॅरोल ड्वेक यांनी विविध क्षेत्रातील यशस्वी लोक व विद्यार्थ्यांच्या दोन दशकांच्या अभ्यासानंतर, माईंडसेट ही संकल्पना उपयोजनात आणली. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या क्षमतांबद्दल कोणत्या धारणा,विचार व दृष्टिकोन बाळगते यांस तिचे माईंडसेट असे म्हणतात. माईंडसेट- द न्यू सायकॉलॉजी ऑफ  सक्सेस या त्यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकात त्यांनी माईंडसेट या विषयावर सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यांच्या मते व्यक्ती तिच्या क्षमतांबद्दल सकारात्मक आहे की नकारात्मक यावर तिचे यश अवलंबून आहे आणि म्हणूनच त्यांनी माईंडसेट चे दोन भाग केले.
    १. फिक्स्ट माईंडसेट ( Fixed Mindset)
                        असा माईंडसेट असणारी व्यक्ती आपल्या क्षमतांबद्दल नकारात्मक असते. क्षमता,सर्जनशीलता,बुद्धिमत्ता आणि हुशारी ही अंगभूत गुणवैशिष्ट्ये असतात आणि त्यांच्या पातळीत आपण वाढ किंवा विकास करू शकत नाही.असा त्यांचा ठाम विश्वास असतो. त्यांच्या धारणाही अशाच बदलास प्रतिकूल असतात. अशा व्यक्ती आव्हानांना टाळणाऱ्या असतात.त्यांच्या दृष्टीने यशामध्ये प्रयत्नांना कमी महत्व असते. केवळ उपजत क्षमता व बुद्धिमत्ता चांगली असेल तरच यश संपादन करता येऊ शकते असे वाटणारे असतात. हे लोक अपयश येऊच नये या करीता धडपडत असतात. ते प्रत्याभरणास(Feedback) नकार देतात. एखाद-दुसऱ्या अपयशानंतर लगेचच ध्येयाचा पाठलाग करणे सोडून देतात.
  २. ग्रोथ माईंडसेट (Growth Mindset)
                           असा माईंडसेट असणारे स्वतःतील क्षमतांबद्दल सकारात्मक असतात. आपल्यातील क्षमता, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि हुशारी यामध्ये प्रयत्नाने बदल करू शकतो, त्यांचा विकास करू शकतो,असा परिवर्तनास अनुकूल विचार बाळगतात. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणारे व त्यांना नियंत्रित करणारे असतात. यांचा फक्त चुणचुणीत (smart) दिसण्यापेक्षा नवीन शिकण्याकडे अधिक कल असतो. यांच्यात सतत शिकण्याचा दृष्टिकोन (Learning Attitude) विकसित झालेला असतो. आव्हानांना सामोरे जातात. उत्कृष्टतेचा मार्ग  प्रयत्नांनी पादाक्रांत करता येतो असे मानतात. अपयशातून शिकणारे व पराभवातही टिकणारे असतात. प्रत्यभारणास उत्सुक असतात आणि त्यातून धडेही घेतात. दुसऱ्यांच्या यशाने प्रभावित होतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेतात.
                            वरील दोन्ही माईंडसेट मधील फरक तुमच्या लक्षात आलाच असेल तर, ग्रोथ माईंडसेट किती आवश्यक आहे? हे ही कळले असेल.माईंडसेट केवळ नवीन कौशल्ये शिकण्यातच महत्वाची भूमिका बजावते असे नसून, ते जीवनाकडे आपण कसे पहायला हवे ? कोणत्या धारणा बाळगायला हव्यात? काय विचार करायला पाहिजे? आणि स्वतःला कसे विकसित करायला हवे? यांसारख्या परिवर्तनवादी मानसिकतेच्या उभारणीसाठीही महत्वाचे आहे. शिक्षण, खेळ, उद्योग, आरोग्य, नातेसंबंध आणि अशा सर्वच क्षेत्रांत माईंडसेट तुमची भूमिका निश्चित करत असते. माईंडसेट हा स्वतःवरचा एक ठाम विश्वास असतो, तो जितका सकारात्मक असेल तितके यश आपल्या जवळ येईल. ग्रोथ माईंडसेट तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकते. तुमच्यातील क्षमतांच्या सर्वांगीण विकासासाठी व ध्येयसिद्धी करिता  ग्रोथ माईंडसेट  महत्वाचे आहे.
                    ग्रोथ माईंडसेट विकसित करण्यासाठी ......    
       १.        अंतिम निकालापेक्षा प्रक्रियेवर भर द्या :-
                          Champions focus on the process, rest focus on the result. ध्येयमार्गावरून वाटचाल करीत असताना अंतिम ठिकाणावर पोहचणे महत्वाचे आहेच पण अपेक्षित निकाल हाती येण्यासाठी राबवली जाणारी प्रक्रिया ही तितकीच महत्वाची आहे. खरा आनंद हा प्रक्रियेतून मिळत असतो. प्रक्रिया जितकी प्रभावी होईल यश तितकं जवळ येत जाईल. प्रक्रियेवरील भर तुमची जाणीव प्रगल्भ बनवते पर्यायाने कामगिरी अधिक उंचावते.
       २.        प्रयत्नांचे कौतुक करा :-
          कोणत्याही व्यक्तीच्या फक्त बुद्धिमतेचे किंवा कौशल्याचे कौतुक करण्यापेक्षा, योग्य मार्गानी व योग्य दिशेने केल्याजाणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक व्हायला हवे. असे केल्यास व्यक्ती स्वतःही प्रयत्नांवर अधिक भर देईल.
      ३. परिपूर्णतेचा  अट्टाहास  नको (अपूर्णता स्वीकारा ):-
           कोणीही परिपूर्ण असत नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष वा अवगुण असतातच.त्यांचा स्वीकार न करणे म्हणजे बदलाचे सर्व मार्गच बंद करणे होय. ग्रोथ माईंडसेट असणारी व्यक्ती आपल्यातील कमतरतेचा स्वीकार करते व त्यांच्यात सकारात्मक बदल करते.
      ४. 'आव्हान नव्हे संधी' असे पहा :-
        जीवन कधीच सरळ रेषेत नसते. ते खाच खळग्यांनी भरलेले असते. व्यक्ती समोर येणारी समस्या किंवा आव्हान याकडे स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी म्हणून पाहावे. अशा आव्हानांना संधी म्हणून स्वीकारल्यास व्यक्तींमधील क्षमतांचा विकास सहज शक्य आहे.
      ५. गती पेक्षा विकासावर भर द्या :-
      कोणत्याही कामातील गतीपेक्षा त्यातील विकास महत्वाचा आहे. बऱ्याचदा कार्याचा वेग प्रचंड असतो पण, त्यामध्ये काहीच बदल घडत  नसेल तर, अपेक्षित परिणाम साधले जात नाहीत.
      ६. टीकेकडे  सकारात्मक दृष्टिकोनातून पहा :-  
        फिक्स्ड माईंडसेट असणारे लोक टीका व्यक्तिशः घेतात आणि स्वतःचा आत्मविश्वास गमावतात. आपल्यावर केलेल्या टिकेतून आपल्यात काय बदल करता येईल याचा विचार व्हावा.
      ७. मेंदू लवचिकतेचा ( ब्रेनप्लास्टिसिटी ) अभ्यास करा :- 
       मानवी मेंदू हा शरीराच्या इतर आवयवांसारखाच आहे. व्यायाम आणि सरावाने शरीर कसे मजबूत आणि लवचिक बनवता येते तसेच मेंदूला लवचिक आणि मजबूत बनवता येते. मेंदूमधील न्यूरॉनसची नवीन साखळी निर्माण करता येते. नवीन क्षमता,कौशल्ये विकसित करता येतात. यालाच ब्रेन प्लॅस्टिसिटी असे म्हणतात, याचा सखोल अभ्यास तुमच्या विकासास चालना देईल.
       ८. अपयशातून शिका :-   
       अपयशा सारखा दुसरा गुरू नाही. तुम्हाला यशापेक्षा अपयश बरंच काही शिकवतं. अपयश आल्यावर खचून न जात यशा पासून तुम्ही का दुर राहिलात याचा विचार करून,अपयशातून यशाचे धडे शिकावेत.
    ९.  यशाचा आनंद इतरांसोबत साजरा करा :-  
      यश स्वतःपुरते मर्यादित ठेवणे हे फिक्स्ड माईंडसेटचे लक्षण आहे. आपल्या यशात इतरांना सहभागी करून घ्या. त्यांनाही यशाचे पाठ शिकवा.
   0.'अद्याप ' या शब्दाचा वापर करा :-
         क्षमतांचा कमतरतेचा उल्लेख करताना व्यक्ती बऱ्याचदा नकारात्मक विधानांचा वापर करत असते. जसे,
मी व्यासपीठावरून बोलू शकत नाही.
मी नीट लक्ष केंद्रित करू शकत नाही.
मी इंग्रजी भाषा बोलत नाही.
                    वरील विधाने विशिष्ट क्षमतांबद्दल अविश्वास दर्शवितात पण या विधांनामध्ये 'अद्याप' हा शब्द आशावाद निर्माण करतो.
जसे,
मी अद्याप व्यासपीठावरून बोलू शकत नाही.
मी अद्याप लक्ष केंद्रित करू शकत नाही.
मी अद्याप इंग्रजी भाषा बोलत नाही.
               नकारात्मक विचारांमध्ये शक्यतेची बीजे पेरण्यासाठी 'अद्याप ' शब्द कामी येतो.
                ग्रोथ माईंडसेट विकसित करणे ही जितकी तारेवरची कसरत आहे तेवढेच सोपेही आहे. त्याकरिता गरज आहे ती हेतुपूर्वक प्रयत्नांची. ग्रोथ माईंडसेटमुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात सहजपणे यशस्वी होऊ शकता.

लेखन:- 

अभिजीत मानव 
लाईफ कोच , माईंड ट्रेनर आणि प्रेरणादायी वक्ते. 
9503839760
www.exceltrainings.in






2 comments: