Monday, 30 March 2020

IKIGAI - A SECRET OF LONG AND HAPPY LIFE




IKIGAI इकिगाई
(शतायुषी सुखी जीवनाची गुरुकिल्ली)

                            तुमच्या प्रत्येक वाढदिनाला, 'तुम्ही शतायुषी व्हा!', 'दीर्घायुषी व्हा! 'किंवा' तुमचे जीवन निरोगी, आनंदी आणि समृद्ध होऊ दे! 'अशा नानाविध शुभेच्छांचा वर्षाव तुमच्यावर होत असेल ना? लोक आपल्या सुखी जीवनासाठी मनोकामना करत असतातच आणि कुणाला शंभरी पार पाडावी असं वाटणार नाही ? प्रत्येकाला आपण नेहमीच तरुण आणि ठणठणीत राहून जीवनाचा भरपूर आस्वाद घ्यावा अशी इच्छा असतेच पण, खरंच शतायुषी होणे आणि तेही निरोगी,कार्यक्षम आणि समाधानी असणं शक्य आहे का? असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे कारण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे जरूर केलेले आहे पण, आधुनिकीकरण , वाढणारी स्पर्धा , सर्व प्रकारचे वाढते प्रदूषण, नॅनो टेक्नॉलॉजीच्या युगातही निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या विविध समस्या, सामाजिक कौटुंबिक कलह , बिघडणारे नातेसंबंध  आणि या सगळ्यामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाने व्यक्तीचे शतायुषी सुखी जीवनाचे स्वप्न, केवळ स्वप्नच उरले आहे किंबहुना ते दिवास्वप्नच ठरत आहे.  
                                 पण अशाही समस्येने ग्रस्त, नकारात्मक दुनियेत  दीर्घ , स्वस्थ , कार्यक्षम आणि सुखी आयुष्य जगणारे लोक देखील आहेत, बरं का ? आणि तेही आपल्याच जगात, याच भूतलावर. अशी माणसे ज्या प्रांतात आढळतात त्यास ब्लू झोन असे म्हटले जाते. या मध्ये जगातील एकूण प्रांताचा समावेश होतो यांत प्रामुख्याने जपान मधील ओकिनावा या प्रांताचा समावेश होतो. येथील लोक शतकोत्तरी आयुष्यमान असणारे आहेत. शिवाय ते आयुष्याच्या शेवटापर्यंत निरोगी,स्वस्थ, कार्यक्षम आणि समाधानी जीवन जगतात. अशा लोकांच्यावर केलेल्या संशोधनाअंती असे लक्षात आले कि, हे लोक दीर्घायुषी,कार्यक्षम आणि निरोगी असण्या मागील  कारण म्हणजे 'इकिगाई '(IKIGAI) होय. हे जीवन जगण्याचे एक प्रभावी तत्वज्ञान आहे.  इकिगाई(IKIGAI) हा जापनीज शब्द असून तो इकी (IKI) आणि गाई (GAI) या पासून बनला आहे. इकी  म्हणजे जीवन आणि गाई म्हणजे मूल्य किंवा उपयुक्तता. एकूणच याचा अर्थ 'अस्तित्वाचे कारण' असा घेतला जातो. यांच्या अस्तित्वाला निश्चित असा अर्थ असतो. या लोकांकडे अस्तित्वाचे ठोस कारण असते. ते का जगत आहेत? कशाकरिता जगत आहेत? त्यांच्या जगण्यामागील प्रेरणा काय आहे? हे स्पष्ट असते. त्यांच्याकडे ध्येय (GOAL) असते. त्यांच्याकडे जगण्याचा हेतू (PURPOSE) असतो. म्हणजेच त्यांना त्यांचे इकिगाई उमगलेले असते. इकिगाई गवसलेली माणसं आपले संपूर्ण जीवन आंनदाने साजरे करतात. त्यांच्यात सततचा उत्साह दिसतो. त्यांचा जीवन दृष्टिकोन प्रगल्भ असतो. त्यांच्या विचारात सकारात्मकता आणि वर्तनात संतुलितपणा असतो. त्यांचे स्वास्थ्य नेहमीच चांगले असते. मनोकायिक आजारांपासून ते कोसो दूर असतात. उच्च दर्जाच्या जीवनशैली मुळे, सर्वसामान्यांना जडणाऱ्या उच्च रक्तदाब,मधुमेह,हृदयविकार,कर्करोग या सारख्या रोगांना त्यांचा जीवनात अजिबात थारा असत  नाही. त्यांची कार्यक्षमता उतार वयातही तरुणाला लाजवेल अशी असते. जीवनाच्या सर्वच आघाड्यांवर ते यशस्वी होतात. प्रत्येकाची इकिगाई वेगळी आणि व्यक्तिगत असली तरी याचे जीवन तत्वज्ञान मात्र सारखेच असते.   इकिगाई अर्थातच अस्तितवाचे कारण किंवा मूल्य गवसते तर कसे ? हे खालील वेन आकृतीच्या सहाय्याने समजावून घेऊयात.



       इकिगाई मध्ये खालील चार घटकांचा विचार केला जातो.

  तुम्हाला काय प्रिय आहे ?
                          बऱ्याचदा तुम्हास काय प्रिय आहे हे सहजपणे उमगत नाही पण  जी गोष्ट करताना तुमच्या रोमरोमात ऊर्जेचा संचार होतो, तुम्हांस आनंद मिळतो शिवाय ती सहज घडत असते ते काम तुम्हास प्रिय असते. ते काहीही असू शकते, जसे लोकांशी  बोलणे, लोकांना सल्ला देणे,फोटोग्राफी करणे,प्रवास करणे,वाचन करणे वा लेखन करणे ई.
 
   तुम्ही कशात पारंगत आहात ?
                       हा प्रश्न तुमच्या क्षमता आणि कौशल्यांशी निगडित आहे ज्या तुमच्या व्यक्तिगत किंवा व्यावसायिक जीवनाशी संबंधित असतात. अशा क्षमता व कौशल्ये उपजत असतील वा तुम्ही प्रयत्नांनी विकसित केलेली असू शकतात.

   जगाला कशाची गरज आहे ?
                    या मध्ये तुमच्या भोवताली असणाऱ्या संपूर्ण जगाला काय अपेक्षित आहे त्याची काय गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे.

       तुम्हाला कशा करिता पैसे दिले जावू शकतात ?
                  जग तुम्हाला कशा करिता पैसे देऊ शकते. तुम्ही असं काय करू शकता ज्याचा तुम्हाला आर्थिक मोबदला दिला जावू शकतो.



  तुम्ही जे काम करताय ते तुम्हास प्रिय असेल आणि त्यात तुम्ही पारंगत असाल तर ते तुमचे पॅशन (Passion - तीव्र आवड) असते.

  जगाला ज्याची गरज आहे ते तुम्हास प्रिय असेल तर ते तुमचे मिशन (Mission) असते.          

  जगाला ज्याची गरज आहे आणि ज्या करिता तुम्हाला मोबदला दिला जातो तो तुमचा पेशा (Vocation) असतो.

  ज्या करिता तुम्हाला आर्थिक मोबदला दिला जातो आणि ज्यात तुम्ही पारंगत आहात तो तुमचा व्यवसाय (Profession) असतो.


                           वरील पैकी दोन किंवा तीन घटक एकत्र येऊनही तुम्ही तुमच्या जीवनात योग्य समतोल निर्माण करू शकत नाही. त्याकरीता तुम्ही असं काहीतरी निवडावं लागेल जे तुम्हाला प्रिय आहे, ज्यामध्ये तुम्ही पारंगत आहात, ज्याची जगाला गरज आहे आणि त्या करीता तुम्हाला आर्थिक मोबदला दिला जाईल आणि हेच तुमच्या अस्तित्वाचे कारण म्हणजेच तुमचे इकिगाई(IKIGAI) असेल. तुमच्या जीवनाचा हेतू असेल. जो तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देईल. अशा जीवनात योग्य समतोल साधला जाईल.
                                  केवळ इकिगाई माहिती करून उपयोगाचे नाही तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड आवश्यक आहे.   तुमच्या कृती ह्या तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या आणि PASSION + MISSION + PROFESSION + VOCATION यांत समतोल साधणाऱ्या असाव्यात.  तुम्ही तुमचे इकिगाई प्राप्त करून सुखी आणि दीर्घायुषी  व्हावे  हीच सदिच्छा !!!


लेखन-

अभिजीत मानव
( लाईफ कोच, माईंड ट्रेनर आणि  मोटिव्हेशनल स्पीकर )
EXCEL TRAINING SYSTEM
9503839760
www.exceltrainings.in
                                           

     


No comments:

Post a Comment