बुद्धिमत्ता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अल्बर्ट आईन्स्टाईनची प्रतिमा उभी राहते कारण आईन्स्टाईनची बौद्धिक क्षमता आणि त्याचा बुध्दीगुणांक(IQ) हा नेहमीच सर्वांच्या औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. म्हणूनच आईन्स्टाईनच्या पश्चातही त्याच्या मेंदूवर विविध संशोधने सुरू आहेत. आपल्यातील प्रत्येकाला आपलीही बुद्धीमत्ता आईन्स्टाईन सारखी असावी असे केव्हा ना केव्हा तरी वाटत असते,कारण शालेय जीवनातील यश संपादन करण्यापासून ते व्यावसाईक जीवनात यशस्वी होण्यापर्यंत बुध्दीगुणांक (Intelligent Quotient) किंवा बुद्धिमत्ता महत्वाची मानली जाते आणि अशाप्रकारची बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करत असतो. त्या करिता विविध मानसिक सराव करतोच शिवाय बुध्दीगुणांक वाढीसाठी औषधेही घेत असतो. खासकरून पालक मंडळी आपल्या पाल्यांच्या बुद्धीमत्ता विकासासाठी नेहमी धडपडत असतात.मानवाची विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती त्याच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचेच द्योतक आहे. बुद्धिमतेच्या जोरावरच त्याने परग्रहापर्यंत मजल मारली आहे. आता तर त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार केला आहे.तर्क,विश्लेषण,आकलन, समस्येची सोडवणूक यासारख्या क्षमतांना उपयोजनात आणणारी सामान्य बुद्धिमत्ता महत्वाची आहेच,पण अश्या प्रकारच्या बुद्धिमत्तेला आपण नको इतकं तर महत्व देत नाही ना? याचा विचार करायला हवा.
कारण आपल्या संपूर्ण जीवनात घडणाऱ्या सामान्य वा क्लिष्ट व्यवहारातील गुंतागुंत केवळ सामान्य बुद्धिमत्तेच्या(IQ) जोरावर साेडवताना आपण मात्र, त्यामध्ये निर्माण होणाऱ्या भावना व त्यांचा परिणाम याचा विचार करत नाही.परिणामी बुद्धिमत्तेचा कस लागूनही व्यवहारात अपेक्षित यश संपादन करता येत नाही. म्हणूनच जीवनात यशस्वी होण्यासाठी भावनांना विचारत घेणे व त्यांचा योग्य वापर करणे अत्यावश्यक आहे यालाच भावनिक बुद्धीमत्ता (Emotional Intelligence) असे म्हटले जाते. भावनांचा व्यक्तीच्या मनोशारीरीक अवस्थांवर, वर्तनावर आणि एकूणच त्याच्या कार्यपद्धती वरती अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होत असतो. नकारात्मक विचार व भावनांचा शरीरावर होणारे परिणाम किती भयानक असतात हे सर्वश्रुत आहेच. अलिकडलच्या संशोधनानुसार व्यक्तीचे यशापयश हे सामान्य बुद्धिमत्ते(IQ) पेक्षा भावनिक बुद्धिमत्ते (EQ)वरती अधिक अवलंबून असते. यशस्वी व संतुलित जीवन विकासामध्ये सामान्य बुद्धबीमत्ता केवळ २०% तर भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा तब्बल ८०% इतका असतो हे सर्वमान्य झाले आहे.व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक विकासासह त्याचा भावनिक विकास होणे सुखी जीवनासाठी आवश्यक असते. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना समजून घेतल्यास भावनांचा योग्य विकास होणे सहज शक्य आहे.
डॅनियल गोलमन यांनी आपल्या Emotional Intelligence: why it can matter more than IQ या पुस्तकात भावनिक बुद्धिमत्तेची (EQ) सविस्तर चर्चा केलेली आहे. स्वतःच्या भावना ओळखून त्यांचे योग्य व्यवस्थापन करता येऊन स्वयंप्रेरणेने कार्यास सिद्ध होणे शिवाय इतरांच्याही भावना ओळखता येणे आणि यांमधून सामाजिक आंतरक्रिया सुरळीतपणे पार पाडणे हे सर्व भावनिक बुद्धिमत्तेमध्ये अपेक्षित आहे. भावनिक बुद्धीमत्ते मध्ये एकूण पाच घटकांचा विचार केला जातो. ते घटक खलील प्रमाणे.
१) स्वजाणीव ( Self awareness):-
आपल्या मनात विचारचक्र अविरतपणे चालू असते त्यातून विविध भावना निर्माण होत असतात. भावनिक बुद्धिमत्तेच्या पहिल्या टप्प्यात आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांना जाणणे अपेक्षित आहे. सुखकारक व दुःखकारक भावना ओळखता यायला हव्यात शिवाय त्यांना नामाभिधान देखील करता यायला हवे. भीती,राग,मत्सर,द्वेष,न्यूनगंड यासारख्या अहितकारक तर प्रेम,आपुलकी, आत्मविश्वास, करुणा यासारख्या हितकारक भावना जाणवत येणं महत्वाचं आहे. भावना ओळखता आल्या नाही तर, भावनिक स्वास्थ्य सहजपणे साध्य करता येत नाही. यातूनच माणसाला स्वतःच्या कार्यक्षमतेचीही ओळख होते.
२) भावनांचे नियमन/ व्यवस्थापन (Self Regulation):-
दुसऱ्या टप्प्यात भावनांचे योग्य व्यवस्थापन करता येणं अपेक्षित आहे. मनात निर्माण होणाऱ्या भावनांचे दमन न करता त्यांचे योग्य नियमन करता यायला हवं.भावनांना नियंत्रीत करता येण्या सोबतच त्यांना योग्य दिशा देता यायला हवं. भावनांचा योग्य समतोल साधला गेला पाहिजे.कोणतीही कृती करण्यापूर्वी त्या मागील भावनांचे योग्य आकलन करता यायला हवं. दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद देत असतानाही भावनांना विचारपूर्वक हाताळता येणं आवश्यक आहे.
३) स्वयंप्रेरणा (Self-Motivation):-
स्वयंप्रेरीत होऊन कार्य सिद्धीस पोहचवणे हे उच्च भावनिक बुद्धिमत्तेचे महत्वाचे लक्षण आहे. कोणत्याही अडथळ्यांना न जुमानता पुढाकार वृत्तीने ध्येय साध्य करता येण्यासाठी व्यक्तीने स्वयंप्रेरित असायला हवं. तात्काळ मिळणाऱ्या लाभपेक्षा दीर्घकालीन लाभाचा विचार, स्वयंप्रेरणेने रुजविता येतो. भावनांच्या जाणिवेने, हितकारक भावनांच्या निवडण्याने व त्यांवर नियंत्रण ठेवून योग्य दिशादर्शन केल्याने स्वयंप्रेरणा अधिक बळकट होईल.
४) तदानुभूती (Empathy):-
व्यक्तीला स्वतःसह इतरांच्याही भावना ओळखता येणं आवश्यक आहे.एखाद्याच्या वर्तनाचा चुकीचा अर्थ काढण्यापेक्षा, त्यामागील भावनांचा उलगडा करता येणं व त्यांना समजून घेणं हे उच्च भावनिक बुद्धिमत्तेचे अंग आहे. समोरील व्यक्ती ही आपल्यासारखीच असून, तिच्याही मनात आपल्यासारख्याच भावना निर्माण होतात हे समजून घेणे गरजेचे असते. इतरांच्या भावनांनाचा स्वीकार करणे, समजून घेणे व त्यांचा आदर करणे आपल्यातील तदानुभूती प्रगल्भ करते.इतरांच्या बद्दल कणव बाळगणे व त्यांच्या सुख दुःखात त्याच भावनेनं सहभागी होता यायला हवं.
५) सामाजिक कौशल्ये( Social Skills):-
माणूस हा सामाजिक प्राणी आहे.जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याचा समाजाशी संबंध येत असतो.यातून विविध सामाजिक आंतरक्रिया घडत असतात. या आंतरक्रिया प्रभावी व फलदायी होण्यासाठी भावनांचा सुयोग्य वापर होणे आवश्यक आहे. व्यक्तीला व्यक्तिगत, सामाजिक व व्यावसायिक जीवनात वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. या भूमिकांना न्याय देण्यासाठी भावना विकासाद्वारे सामाजिक कौशल्ये आत्मसात करणे सहज शक्य आहे. संभाषण कौशल्य, नेतृत्व कौशल्य, समस्या सोडवण्याचे कौशल्ये या सारखी जीवनोपयोगी सामाजिक कौशल्ये भावनिक विकासातून सहजच आकारली जातात.
बदलती जीवनशैली, सामाजिक आंतरक्रियेचे बदलते स्वरूप व व्यक्तीच्या व्यक्तिगत इच्छा अपेक्षा यातून भावनांचा कल्लोळ वाढतो आहे.याचा व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो आहे. ताणतणाव,चिंता,काळजी,निराशा,उदासीनता,चिडचिडेपणा या सारख्या अहितकारक भावना दिवसेंदिवस वाढत आहेत. मनोकाईक (Psychosomatic) आजारांचे प्रमाण वाढते आहे.नातेसंबंधातील बिघाड ही समस्या घराघरांत जाणवत आहे. शिवाय अनियंत्रित भावनांचा तोटा व्यक्तीसह समाजासही होत आहे. अशा स्थितीत भावनिक बुद्धीमत्ता समजून घेणे व तिचा दर्जा वाढविणे काळाची गरज ठरत आहे.
Let's enhance our EQ
Mr.Abhijeet Manav
(Life Coach, Mind Trainer & Motivational Speaker)
9503839760
www.exceltrainings.in


