Friday, 5 June 2020

                        मन करा रे प्रसन्न
                 मन, मानवाला निसर्गाने दिलेले अद्दभूत वरदान. मानवाने याला जेवढे जाणून घ्यावे तेवढे कमीच. त्याच्या बद्दल शतकोणी शतके कितीही संशोधन केले तरी अजूनही माणूस त्याच्या तळाशी पोहचला नाहीच. एक असे गूढ त्याची उकल करताना असंख्य गुपिते पुन्हा निर्माण होतात. कोण म्हणत मेंदू म्हणजेच मन तर कोणाला मन मेंदूपेक्षा वेगळं वाटत जे काही असेल ते पण, माणसाला हसविणारे, रडवणारे, त्याचा करता  करविता,मार्गदर्शक,सहकारी,त्याला आत्मविश्वास देनारे, घाबरवणारे,शिवाय त्याला प्रगतीकडे नेणारे वा त्याला नेस्तनाबूत करणारे मन मात्र प्रत्येकाकडे आहे. मन अदृश्य असते पण त्याच्या करामती मात्र दृश्य आणि जगजाहीर असतात.सर्वांच्या सहज लक्षात येणारे वर्तन हे मानामुळेच घडते.मन हे व्यक्तीच्या आतील व बाहेरील जगाच्या जाणिवेचे केंद्र आहे. 
आपले विचार,भावना,धारणा,दृष्टिकोन,स्मृती,जाणीव, आकलन,तर्क-वितर्क,सुख वा दुःख या सर्वांचे उगम मनामध्ये आहे.थोडक्यात माणसाचे अस्तित्व मनामुळेच आहे.माणूस जो काय आणि कसा आहे ते फक्त मनामुळेच.मानवाच्या मनाचा मृत्यू हाच त्याचा मृत्यू असतो.जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःला समजून घेत असतो तेव्हा तो आपल्या मनालाच जाणून घेत असतो.व्यक्ती मनाच्या जेवढा जवळ पोहचेल, त्याच्या बद्दल जेवढे जाणून घेईल व त्याचे आरोग्य जेवढे निकोप ठेवेल तेवढा तो प्रगल्भ होईल.मनाला जवळून पाहिल्यास,ऐकल्यास व त्यास जाणल्यास व्यक्तीआपले संपूर्ण जीवनआनंदाने,सुखाने व यशस्वीपणे जगेल यात शंकाच नाही.
                       मानवाचे मन व शरीर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.ते एकाच रचनेचे भाग आहेत. त्यांची कार्यपध्दतीही परस्परावलंबी आहे. त्यातील एकावर होणार परिणाम हमखास दुसर्यावरही होतोच.शरीर व मन कधीच वेगळे होऊ शकत नाहीत.मन हे सॉफ्टवेअर तर शरीर हे हार्डवेअर आहे. दोघांमधील कोना एका घटकातील बिघाड मानवास वेदना देतो म्हणून दोहोंच्याही आरोग्याची काळजी घेणे अगत्याचे आहे.अलीकडे सर्वचजण शरीराच्या आरोग्याबद्दल जागरूक आहेत पण मनाचे आरोग्य जेवढे सांभाळले जाणे आवश्यक आहे तितके सांभाळले जात नाही. आताच्या जीवनात वाढलेली धावपळ त्यामुळे मनावर येणार अतिरिक्त तणाव,निराशा,चिडचिडेपणा,उदासीनता, व्दिधावस्था,उद्विग्नता आणि या सगळ्यामुळे जीवनावर होणार वाईट परिणाम टाळणेसाठी मनाला जपावे लागेल. मानवी जीवनाला उन्नत करणारे मन निर्माण करणेसाठी व मानवास त्रासदायक ठरणाऱ्या अहंकार,द्वेष,मत्सर,वासना,हेकटपणा,क्रोध आणि याच सारख्या नकारात्मक भावनांना समूळ नष्ट करणेसाठी मनाचे आरोग्य जपावे लागेल.   
मन हि जगातील सर्वात सुपीक जमीन आहे. यात तुम्ही जे काही पेराल ते उगवते पण याच याच वैशिष्ठ हे आहे की यात नको असलेले तणकट लवकर रुजते व उगवतेही याची वाढ हि आवश्यक असलेल्या पिकापेक्षा कैकपटीने अधिक आहे. अशा प्रकारचे तणकट रुजू नये,उगवू नये किंवा उगवले तर पटकन ते नष्ट केले जावे याची काळजी घ्यायला हवी.शिवाय मन नावाची ही सुपीक जमीन अधिक उपजाऊ होऊन आपणास हवे ते मिळवून देण्यासाठी त्याचे आरोग्य जपावेच लागेल. मनातील नकारात्मक विचार,दूषित दृष्टिकोन,अनियंत्रितभावना,निराशा,उदासीनता,अहंकार,तुसडेपणा, न्यूनगंड,क्रोध,द्वेष,मत्सर यासारख्या तणकटांचे उच्चाटन करून,प्रेम,माया,स्नेह,आपुलकी,सहानुभूती, आदर,विश्वास,सहकार्य,उत्साह,नम्रता,प्रामाणिकपणा,साकारत्मकता,आशावादी दृष्टिकोन,कृतज्ञता,सत्य धीटपणा,शांती यासारख्या भावनांचे बीजारोपण करणे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी गरजेचं आहे.  तुम्हाला अपेक्षित असलेले सुखी,समाधानी,समृद्ध व आनंदी जीवन हे केवळ मनाच्या निरोगी असण्यानेच शक्य होणार आहे.
     तुमच्या मनाचे आरोग्य जपणे. ते सतत प्रसन्न ठेवणे. उत्साही ठेवणे. हि तुमची स्वतःची जबाबदारी आहे. त्याकरिता तुम्ही स्वतः पुढाकार घेणे अपेक्षित आहे.प्रत्यक्ष जाणीवपूर्वक कृतीनेच आपण मनाचे आरोग्य सांभाळू शकतो. त्याकरिता पुढील गोष्टी विचारात घ्या.
स्वतःचे मन ओळखा: आपण कित्येकदा दुसऱ्याचे मन ओळखल्याचा आव आणत असतो पण स्वतःचे मन मात्र आपण खचितच जाणतो. दुसर्याबद्दल इतंभूत माहिती ठेवणारे आपण स्वतःपासून कोसो दूर असतो. स्वतःच्या मनाला जपण्यासाठी त्याला जाणून घेणे आवश्यक आहे. मन ओळखायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? तर केवळ मनातील भावना, विचार,इच्छा,अपेक्षा,क्षमता, दृष्टिकोन,श्रद्धा,धारणा,मते,आवड-नावड,कल्पना शिवाय आजूबाजूच्या व्यक्ती व घटनांनबद्दल काय वाटतंय. अशा घटकांना जवळून पाहायचं, त्यांना ऐकायचं,जाणवायचं.
 मनाची दारे सताड उघडी ठेवा: कल्पना करा कि तुम्ही एका अशा खोलीमध्ये बसलेले आहात जिच्या खिडक्या व दरवाजे पूर्णपणे बंद आहेत. बाहेरील हवा आतमध्ये येत नाही व आतील हवा बाहेर जात नाही.अशा बंदिस्त जागेत काय होऊ शकेल?  सुरुवातीला काहीच वाटणार नाही कारण खोलीमध्ये पुरेसा ऑक्सिजन असेल पण काही वेळाने खोलीतील हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होईल,कार्बनडायॉक्साईडचे प्रमाण वाढून हवा प्रदूषित होईल.तुमचा जीव गुदमरेल आणि बरच काय होऊ शकेल. अशी परिस्थिती निर्माण न होण्यासाठी काय करायला हवे? तर आपल्या खोलीच्या खिडक्या व दरवाजे उघडे ठेवायला हवेत. बरोबर ना?
    आपल्या मनाचपण असच आहे. आपण बाहेरील नवनवीन विचार, कल्पना,मते व दृष्टिकोन याना आत येऊच दिल नाही शिवाय आपणही कोणासमोर आपली मते,कल्पना,भावना व विचार व्यक्त नाही केले तर मन गुदमरेल. ते आजारी पडेल. प्रदूषित होईल.त्याची कार्यक्षमता कमी होईल. क्रियाशीलता संपेल.नावीन्यनिर्मिती होणार नाही. संपूर्ण जीवन प्रवाहच थांबेल.
     म्हणून मनाची दारे सताड उघडी ठेवा जेणेकरून विचारांची देवाण घेवाण होईल. मन अधिक प्रसन्न राहील.ते प्रगल्भ होईल. निरोगी राहील.तुमचे जीवन सुखी व समृद्ध होईल.
३.सजगता बाळगा:आपले वर्तन हे विचार व भावना यावरती अवलंबून आहे. या सर्वांचे मूळ मात्र आपल्या अबोध मनामध्ये असते त्यामुळे बऱ्याचदा असे विचार व वर्तन व्यक्तीच्या अगदी नकळतपणे समोर येत असते. पण असे वर्तन अपेक्षित परिणाम मिळवून देत नाही. कारण त्या सहजच आणि नेहमीच्याच क्रिया वा प्रतिक्रिया असतात आणि मग आपणास दुःख,निराशा,उदासीनता याना सामोरे जावे लागते कि ज्यामुळे मनाचे आरोग्य धोक्यात येते. म्हणूनच आपण आपल्या भावना,विचार व वर्तनाप्रती सतत जागरूक व सजग असायला हवे. आपल्या मनात नेमके कोणती आवर्तने सुरु आहेत. विचार चक्र योग्य दिशेने आहे कि नाही. ते सकारात्मक कि नकारात्मक आहेत,भावना नियंत्रित आहेत कि मोकाट आहेत, दृष्टिकोन विवेकी आहेत कि अविवेकी आहेत यांकडे जाणीवपूर्वक सजगतेने पाहावे. सजग राहून त्यांना ऐकावे शिवाय जाणवावे.
४. लोक काय म्हणतील हा विचार सोडा: लोक काय म्हणतील? त्यांना काय वाटेल?ते काय विचार करतील? असे प्रश्न तुमचं जगणं मर्यादित करतात. बऱ्याच कृतीमध्ये आपणाला काय फायदा-तोटा होईल, समाधान मिळेल कि नाही, याचा विचार करण्यापूर्वी लोकांचं काय? याचाच विचार जास्त करतो.मग अशावेळेला जीवनात सुख,आनंद व समाधान देणाऱ्या कित्येक क्रियांना आपण दाबून टाकतो व स्वतःला नको असतानाही मन विरुद्ध क्रिया करत असतो. कित्येक लोक मोठ्याने हसणे देखील गुन्हा मानतात व हसणे टाळतात. समाजाचे स्वास्थ्य अबाधीत राखणारी व कोणाला कसलाही त्रास न देणारी कृती बिनधास्त करा. ती कृती लोकांना आवडेल किंवा नाही याचा विचार करूच नका. मनाला दाबून कोंडमारा करू नका. मनाचे आरोग्य जपा.तुमच्या ज्या वर्तनाला जे लोक आज वाईट म्हणतील तेच लोक कालांतराने तुमच्या वर्तनाचे अनुकरण करतील.
५. चांगल्या सवयी व छंद जोपासा: मनाच्या समृद्धीसाठी व आरोग्यासाठी चांगल्या सवयी व छंद यांची खूप आवश्यकता आहे. सकाळी लवकर उठणे,व्यायाम करणे,योग्यवेळी खाणे,वाचन करणे,यशस्वी लोकांना भेटणे,नवीन गोष्टी शिकणे,विविध उपयोगी विषयांवर चर्चा करणे,विविध मैदानी खेळ खेळणे,लेख लिहिणे,पेंटिंग करणे यासारख्या सवयी व छंदांमुळे मनाची कार्यक्षमता वाढते. सर्जनशीलता वाढते.मन कल्पक बनते.
6. रिकाम्या वेळेची विल्हेवाट लावा: मराठीमध्ये एक म्हण आहे, 'रिकामं मन सैतानाचा घर'. हे खरंच आहे मनामध्ये नको असलेले विचार तेव्हाच थैमान घालतात जेव्हा तुमचं मन रिकामं असत. रिकामं म्हणजे जेव्हा तुमच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो व आता रिकाम्या वेळेचं करायचं काय? असा प्रश असतो अशा वेळी मनात तात्पुरते सुखावणारे पण दीर्घकालीन दुखावणारे वाईट विचार मनात येतात,ज्याचा परिणाम मनावर, शरीरावर व सामाजिक स्वास्थ्यावरही होतो. जर तुम्ही वेळेचे योग्य नियोजन करू शकलात तर मन सतत चांगल्या विचारात व्यस्त राहील व आपोआपच मनाची सुदृढता जपली जाईल.
७. ध्यान करा: ज्या प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये कोणीही आपले प्रतिबिंब पाहू शकत नाही,त्या करीत पाणी शांत आणि निश्चल असायला हवे. त्याच प्रकारे मन समजून घेण्यासाठी. जाणून घेण्यासाठी. त्याच्या तळाशी जाऊन. निरोगी मनाची निर्मितीसाठी ते शांत,स्थिर व निश्चल असायला हवे. त्यासाठी गरज आहे ध्यानाची. ध्यान हा निरोगी, समृद्ध व शुद्ध मनाचा पाय आहे. ध्यानाने होणारे फायदे हे जगजाहीर आहेत. कित्येक मनोकायिक आजार हे निव्वळ ध्यानाने बरे होतात. मनावरील अतिरिक्त ताण-तणाव,चिंता,काळजी,निराशा,उदासीनता कमी होईल व्यक्तीला मानसिक, शारीरिक व सामाजिक  स्थैर्य व स्वास्थ्य मिळते.  ध्यानाचे अनेक प्रकार आहेत पैकी सर्वात सोपा प्रकार म्हणजे श्वाछोश्वासावर लक्ष केंद्रित करणे. असे ध्यान प्रत्येकाने सकाळी किंवा रात्री करणे गरजेचे आहे.
८. रीलॅक्सेशन करा: ध्यानामुळे होणारे फायदे रिलॅक्सेशन किंवा शिथिलीकरणाने होतात. शिथिलीकरणामुळे मनासोबतच शरीरही तणावमुक्त होते. शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करून प्रत्येक भाग शिथिल करायचा आहे. पायांच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करा. मनाचे आरोग्य निश्चितच चांगले राहील.
           तुमचे वय २५ असो वा ७५, तुम्ही स्री असा कि पुरुष, तुम्ही कोणीही असलात तरी तुम्हाला मन आहे आणि त्याचे आरोग्य नियमित टिकविण्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील. आपण अभ्यासलेल्या तंत्रांशिवाय आणखीन उपयोगी तंत्रे तुम्हास शिकावी लागतील. आता पर्यंत माणूस त्याचा मनाचा केवळ २०% वापर करू शकला आहे. तुम्ही जर मनाचे आरोग्य जपण्यात यशस्वी झालात तर तुम्ही जीवन यशस्वी केलत म्हणून समजा. जगातील कोणतीही गोष्ट सहज साध्य करण्याची संपूर्ण क्षमता मनामध्ये आहे पण आवश्यकता आहे मन सदोदित प्रसन्न असण्याची आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात...  
   मन करा रे प्रसन्न        सर्व सिद्धीचे कारण .... 
   मोक्ष अथवा बंधन       सुख समाधान इच्छा ते 
   मने प्रतिमा स्थापिली   मने मना पूजा केली 
  मने इच्छा पुरविली       मन माउली सकळांची 
  मन गुरु आणि शिष्य    करी आपुलेचि दास्य 
  प्रसन्न आप आपणास     गतीअ अथवा अधोगती 
 साधक वाचक पंडित     श्रोते वक्ते एका मात नाही नाही आन दैवत      तुका म्हणे दुसरें

No comments:

Post a Comment

Beyond Habits: The Power of an Identity Shift

  Beyond Habits: The Power of an Identity Shift Most people approach change backward. They say, "If I go to the gym every day (Action),...